लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी ‘फटके देऊन’ परत पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:34 IST2022-06-16T13:14:58+5:302022-06-16T14:34:40+5:30
मुंबईच्या वऱ्हाडींना ‘फटके देऊन’ परत पाठवून देण्यात आले, रात्री साडेनऊ वाजता नवरीचा लागला दुसरा विवाह

लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी ‘फटके देऊन’ परत पाठवले
औरंगाबाद : लग्नासाठी आलेल्या मुंबईच्या वऱ्हाडाने जेवणासह मानापमानामुळे वाद घातला. या विसंवादात लग्न लागले. लग्नानंतर नवरदेवाने मुलगी पसंत नसल्याचे कारण सांगत, नवरीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडाला चांगलेच धुतले. गाड्या फोडून टाकल्या. फुटलेल्या गाड्या घेऊन नवरीविनाच वऱ्हाड मुंबईला निघून गेले. त्यानंतर मुलीचे नात्यातील मुलासोबत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लग्न लावून देण्यात आले. ही घटना शहराजवळील गांधेली गावात बुधवारी घडली.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील प्रभावती (नाव बदललेले) हिचा विवाह मुंबईतील अजय (नाव बदललेले) याच्यासोबत बुधवारी गांधेली येथे आयोजित केला होता. प्रभावतीचे मामा, बहीण गांधेली येथे राहत असल्यामुळे या ठिकाणी विवाह आयोजित केला होता. लग्नासाठी मुंबईहून ट्रॅव्हल्समध्ये नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळी आली. लग्न लागण्याच्या अगोदरच वऱ्हाडीतील अनेक जण दारू पिऊन ‘टुल्ल’ झाले. दुपारी साडेबारा वाजताचे लग्न तीन वाजले तरी लागले नव्हते. त्यापूर्वी काढलेल्या वरातीमध्ये वऱ्हाडी नाचत होते. त्यामुळे उशीर झाला. विनवण्या केल्यानंतर प्रभावतीसोबत लग्न लागले. त्यानंतर वऱ्हाडींनी जेवणावरून गोंधळ घातला. प्रभावतीच्या मेहुण्याने वराकडील मंडळींना ठरल्यानुसार पुरोहिताचे अर्धे पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा चिडलेल्या वराच्या नातेवाइकांनी नवरीच्या मेहुण्याला मारहाण केली.
यावरून वाद विकोपाला गेला. मारहाणीत वधू पक्षाकडील दोन महिलाही जखमी झाल्या. दोघांची डोकी फुटली. वादात गावकऱ्यांनी मध्यस्थी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे हवालदार दिनकर पांढरे, सचिन रत्नपारखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनाही वाद मिटल्याचे सांगितले. वऱ्हाड निघण्याच्या वेळेस नवरदेवाने नवरीच पसंत नसल्याचे सांगितले. तिला सोबत घेऊन जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या नवरीच्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडींना बेदम मारहाण केली. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडून सीट कव्हरही फाडले. नवरीच्या नातेवाइकांच्या दबावात ते नवरीला घेऊन गेलेही असते. मात्र अशा नवऱ्यासोबत नांदण्यास वधूनेच विरोध केला. त्यामुळे मुंबईच्या वऱ्हाडींना ‘फटके देऊन’ परत पाठवून देण्यात आले. या घटनेची चिकलठाणा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रात्री साडेनऊ वाजता लागला दुसरा विवाह
प्रभावतीचा विवाह झाल्यानंतर मोडला. त्यामुळे नातेवाईक चिंतित होते. लगेच दुसरे लग्न लावण्यासाठी नातेवाईक मुलाचा शोध घेऊ लागले. लग्नाला वेगवेगळ्या ठिकाणांहून नातेवाईक आले होते. या नातेवाइकांतील वधूच्या आत्याच्या मुलासोबत रात्री साडेनऊ वाजता दुसरा विवाह लावून दिला गेला. यानंतर वधूच्या नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.