करोडीत इतर संस्थांना दिलेली जागा परत घेण्यास प्रशासन सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:10+5:302021-02-05T04:14:10+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातून उत्तम क्रीडापटू तयार व्हावेत, यासाठी औरंगाबादेतील करोडी परिसरात गट नं.२४ परिसरात दुसरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ...

करोडीत इतर संस्थांना दिलेली जागा परत घेण्यास प्रशासन सरसावले
औरंगाबाद : मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातून उत्तम क्रीडापटू तयार व्हावेत, यासाठी औरंगाबादेतील करोडी परिसरात गट नं.२४ परिसरात दुसरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ बांधण्याची घोषणा २५ जानेवारी रोजी करण्यात आल्यानंतर तेथील इतर संस्थांना दिलेली जागा पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. गट नं. २४ मध्ये १७० एकर जागा तेथे होती. प्रशासनाकडे सध्या १४० एकरच्या आसपास जागा आहे. ३० एकर जागा काही संस्थांना दिलेली आहे. ती जागा आता पुन्हा परत घेण्यात येणार आहे.
२०१७ साली ६०६ कोटींतून क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु त्याला ब्रेक लागल्यामुळे प्रशासनाने मार्किंग केलेली जागा २०२० पर्यंत हळूहळू देण्यात आली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा करोडीत क्रीडा विद्यापीठ बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या जागेवर १६९ प्रस्ताव रद्द करून जागा क्रीडा विद्यापीठासाठी ठेवली होती. परंतु विद्यापीठ पुण्यात जाण्याच्या हालचाली सुरू होताच, काही सरकारी संस्थांनी प्रशासनाकडे जागा मागितली. प्रशासनाने जागा देऊन टाकल्यानंतर आता पुन्हा ती जागा परत घेण्यात येणार आहे. समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्गाच्या जंक्शनलगत करोडी शिवार असल्यामुळे भविष्यातील एका गोल्डन ट्रँगललगत ते विद्यापीठ होईल. ५० ते ६० एकरमध्ये ते विद्यापीठ करण्याचा सुरुवातीचा प्रस्ताव होता.
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशी
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, प्रस्तावित क्रीडा विद्यापीठासाठी जास्त जागा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्या संस्थांना जागा दिलेली आहे, ती जागा ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू आहे. मोजणी करून जागा ताब्यात घेण्यात येईल.