बिडकीन डीएमआयसीसाठी एप्रिलपासून ८ हजार एकर जमिनीचे संपादन: अतुल सावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:00 IST2026-01-09T15:59:48+5:302026-01-09T16:00:59+5:30
चार दिवसीय ॲडव्हान्टेज महाएक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन

बिडकीन डीएमआयसीसाठी एप्रिलपासून ८ हजार एकर जमिनीचे संपादन: अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन इंडस्ट्रियल झोनमध्ये आता जमीन शिल्लक नाही. विविध कंपन्यांकडून सतत जमिनीची मागणी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन बिडकीन डीएमआयसीसाठी आणखी आठ हजार एकर जमिनीचे संपादन एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी आज (दि.८) येथे सांगितले.
शेंद्रा ऑरिक येथे मराठवाडा स्माॅल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या (मसिआ) ९व्या ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. भागवत कराड, खा. डॉ. कल्याण काळे, आ. अनुराधा चव्हाण, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगण, एमआयडीसीचे सीईओ पी. वेलारासू, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, कौस्तुभ धवसे, एथर ग्रुपचे स्वप्नील जैन, टोयोटाचे सुदीप दळवी, जी. शंकरा आणि बेलरीस इंडस्ट्रीजचे श्रीकांत बडवे, मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड आणि सारिका कीर्दक यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंत्री सावे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष प्रेम आहे. ऑटो हब म्हणून ओळख असलेल्या आपल्या शहराची ईव्ही हब अशी नवीन ओळख त्यांनी आणलेल्या गुंतवणुकीमुळे निर्माण झाली आहे. जमिनीची गरज लक्षात घेऊन आणखी ८ हजार एकर जमीन ऑरिकसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या जमिनीच्या संपादनाला एप्रिलपासून सुरुवात होईल. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट आहे. यात महाराष्ट्राचा आणि छत्रपती संभाजीनगरचा मोठा वाटा असेल, असेही त्यांनी नमूद केले. इंटरनॅशनल कन्व्हेेंशन सेंटरकरिता सरकार काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. कराड म्हणाले की, मसिआच्या पहिल्या एक्स्पोची सुरुवात ५० स्टॉलपासून झाली होती. आजच्या प्रदर्शनात १५०० स्टॉल्स आहेत. यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे स्टॉल्स आहेत. येथे मुबलक पाणी, जमीन आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने छत्रपती संभाजीनगर शहर महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून पुढे येत असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसिआचे माजी अध्यक्ष अनिल पाटील यांनी केले.
शहराच्या विकासाचा एकमेव अजेंडा
मसिआने भरविलेला महाएक्स्पो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. शहराच्या जडणघडणीच्या इतिहासात मसिआची नोंद होईल. आज सावे आणि आम्ही ऐकमेकांना काहीही म्हणत असलो तरी आम्हा दोघांचा शहराचा विकास हाच एकमेव अजेंडा असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले. आम्ही आमची राजकीय ताकद उद्योग वाढविण्यासाठी खर्च करीत असतो, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् उद्योगमंत्री न आल्याने हिरमोड
महाएक्स्पोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असल्याने हे नेते महाएक्स्पोच्या उद्घाटनाला येऊ शकले नाही. यामुळे आयोजकांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.