औरंगाबादेत कोरोना संपल्यातच जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:39+5:302021-02-05T04:13:39+5:30

--- औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेपेक्षाही खाली आली आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांच्या रुग्णसंख्येतही घट होत असतांना ...

Accumulated at the end of Corona in Aurangabad | औरंगाबादेत कोरोना संपल्यातच जमा

औरंगाबादेत कोरोना संपल्यातच जमा

---

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेपेक्षाही खाली आली आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांच्या रुग्णसंख्येतही घट होत असतांना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधाचे लसीकरण सुरू झाले. त्याचाही प्रतिसाद वाढत असतांना औरंगाबादेत कोरोना संपल्यातच जमा झाल्याचे चित्र आहे. गजबजल्या बाजारपेठा, लहान मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल, रस्त्यावरची वर्दळ, लोकांतील कोरोनाची भीती नाहीशी झाल्याचे दर्शवीत आहे.

जागरूक नागरिक सूचनांचे पालन करीत मास्क वापरून वावरत असतांना नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होत आहे. कोरोनाची जनजागृती बऱ्यापैकी झाल्याने लोकांतूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. नववी ते बारावीचे वर्गही सुरू झाले. पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरू होत आहे. खेळाची मैदाने गजबजली असून, आता काही अटी व शर्तींच्या अधीन राहून विविध खेळांच्या सरावासाठी विभागीय क्रीडा संकुलही खुले झाले.

--

बाजारपेठा गजबजल्या

--

दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस, संक्रांतीच्या सणानिमित्त शहरासह ग्रामीण भागातील सर्वच बाजारपेठा गजबजलेल्या दिसून आल्या. लग्नसराई सुरू झाल्याने कापड, किराणा दुकानांत गर्दी दिसते आहे.

---

केवळ प्राथमिक शाळा बंद

--

जिल्ह्यात पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा वगळता सर्वच वर्ग बुधवारपर्यंत सुरू झालेले असतील. स्कूल बस सुरू होण्याची पालकांना प्रतीक्षा आहे, तर बहुतांश खासगी क्लासेसही सुरू झाले.

---

शासकीय कार्यक्रमांची रेलचेल

---

महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, राष्ट्रीय दिवस, आरोग्य, कृषी क्षेत्रातील जनजागृती मोहिमा सुरू होऊन त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासकीय मोठ्या बैठका होत आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरेही शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहेत.

---

साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम

--

पुस्तक प्रकाशने, कवी संमेलने, चर्चासत्रांची सुरुवात होऊन आता साहित्य संमेलनाचेही वारे वाहत आहे. विविध मान्यवरांच्या श्रद्धांजली सभा, सत्कार, गौरव सोहळे, पुरस्कारांचे वितरण, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम दरदिवशी विविध भागांत होत आहे.

---

राजकीय बैठका, सभा, आंदोलने सुरू

--

पदवीधर, ग्रामपंचायतीच्या निवडणुका याच काळात झाल्या. राजकीय सभा, उद्घाटन सोहळे, राजकीय आंदोलने दरदिवशी होत आहे. महापालिकेचे वेध लागल्याने वाॅर्डनिहाय बैठकांचे सत्र घडत आहेत. राम मंदिर उभारणी निधी संकलनाच्या भव्य फेऱ्या शहरातून काढल्या जात आहेत.

----

कोट

आरोग्याची काळजी घेणे आवश्यक

सर्वच क्षेत्र पूर्वपदावर येत असताना रुग्ण संख्या घटली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष दिले पाहिजे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक होईपर्यंत तरी सर्वांनी कोरोनासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे.

-डाॅ. विजयकुमार वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी, औरंगाबाद

Web Title: Accumulated at the end of Corona in Aurangabad