खड्डे वाचवताना अपघात! समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजजवळ कार उलटली, ७ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 14:49 IST2025-10-09T14:49:08+5:302025-10-09T14:49:38+5:30
धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी टोलनाका ते कसाबखेडा फाटापर्यंतच्या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. गेल्या ६ महिन्यांमध्ये या मार्गावर ३२ जण जखमी झाले आहे.

खड्डे वाचवताना अपघात! समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजजवळ कार उलटली, ७ जण गंभीर जखमी
दौलताबाद : धुळे-सोलापूर महामार्गालगतच्या जांभाडा गावाजवळील समृद्धी महामार्गाच्या माळीवाडा इंटरचेंज परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे वाचविताना एका भरधाव कार उलटून ७ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज येथून धुळे-सोलापूर महामार्गावरून वेरूळकडे जाणारी एसयुव्ही कार (एम.एच ४२ के.८२३२) समृद्धी महामार्गाच्या माळीवाडा इंटरचेंज परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे वाचविताना उलटली. या अपघातात कारमधील जनार्दन माधवराव निंबाळकर (वय ६० वर्षे), छाया जनार्दन निंबाळकर (५५), पुष्पा नवनाथ तापकीर (४७), श्रद्धा संदीप हिवाळे (३४),उषा अशोक गोरे, (५०), शोभाबाई कुंदनसिंग राजपूत (६७), शालिनी शंकरराव माताडे (४७, सर्व रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज महानगर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हे जखमी झाले. जखमींना जगद्गुरु नरेंद्रचार्य संस्थांच्या रुग्णवाहिकेत ग्रामस्थांच्या मदतीने एमआयडीसी वाळूज येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
६ महिन्यांमध्ये ३२ जण जखमी
धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी टोलनाका ते कसाबखेडा फाटापर्यंतच्या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. गेल्या ६ महिन्यांमध्ये या मार्गावर ३२ जण जखमी झाले आहे. या जखमींना जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेद्वारे खासगी, सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याचबरोबर १०८ रुग्णवाहिका, खासगी वाहनांमध्येही अनेक जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले तसेच मृत व्यक्तींना पोलिस वाहनात नेले जाते. मयतांची संख्या उपलब्ध नाही, अशी माहिती रुग्णवाहिका चालक अक्षय कातखडे यांनी दिली.