५०० रुपयांच्या लाचेची मागणी, ३०० वर तडजोड; एसीबीने मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:05 IST2026-04-09T18:04:17+5:302026-04-09T18:05:59+5:30
'प्रवेश निर्गम उताऱ्या'साठी ३०० रुपयांची लाच महागात पडली; मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात

५०० रुपयांच्या लाचेची मागणी, ३०० वर तडजोड; एसीबीने मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले
छत्रपती संभाजीनगर: शहरातील छावणी भागातील हॉली क्रॉस मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेला ३०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी, (दि.९ ) रंगेहाथ पकडले. मारिया जोस एस्तीबेरो (५२) असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. शाळेचा 'प्रवेश निर्गम उतारा' देण्यासाठी त्यांनी एका माजी विद्यार्थ्याकडे लाचेची मागणी केली होती.
५०० रुपयांची मागणी आणि पडताळणी
तक्रारदाराला त्याच्या वैयक्तिक कामासाठी शाळेच्या निर्गम उताऱ्याची गरज होती. यासाठी त्यांनी मुख्याध्यापिका मारिया एस्तीबेरो यांची भेट घेतली असता, त्यांनी उतारा देण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने कागदपत्रे स्पीड पोस्टाने पाठवूनही पैशांशिवाय काम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ एप्रिल रोजी 'एसीबी'कडे धाव घेतली. ८ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत मुख्याध्यापिकेने ३०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
सापळा कारवाई आणि जप्ती
गुरुवारी दुपारी मुख्याध्यापिका कक्षात सापळा रचला असता, ३०० रुपये स्वीकारल्यानंतर 'एसीबी'च्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सध्या त्यांच्या घराची झडती सुरू असून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 'एसीबी'च्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे, राजेंद्र नंदिले, सचिन बारसे, आशा कुंटे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.