घरातून उचलून नेत गतीमंद तरुणीवर अत्याचार; दुसऱ्या दिवशीही केला पाठलाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:40 IST2025-01-16T19:38:53+5:302025-01-16T19:40:02+5:30
या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

घरातून उचलून नेत गतीमंद तरुणीवर अत्याचार; दुसऱ्या दिवशीही केला पाठलाग
पाचोड : एका २२ वर्षीय मतिमंद तरुणीला घरातून उचलून नेऊन तिच्यावर नराधमाने बलात्कार केल्याची घटना पैठण तालुक्यातील हर्षी बुद्रुक येथे रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी बुधवारी दुपारी आरोपीला अटक करण्यात आली. अनिल वाहुळ (रा. हर्षी बुद्रुक, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपीने घरी कुणी नसल्याची संधी साधून सदर तरुणीला उचलून शेतात नेले. या ठिकाणी आरोपीने तरुणीवर बलात्कार करून तो फरार झाला. दरम्यान, मुलगी घरात नसल्याने नातेवाइकांनी तिचा गावासह नातेवाइकांकडे शोध घेतला, परंतु तिचा शोध लागला नाही. मात्र रात्री दहा वाजता घराशेजारी असलेल्या एका शेतात तरुणी नातेवाइकांना आढळून आली. घडलेला सर्व प्रकार तरुणीने नातेवाइकांना सांगितला. परंतु बदनामीच्या भीतीने नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा सदर आरोपीने तरुणीचा पाठलाग करून छेड काढली. त्यानंतर मात्र बुधवारी दुपारी ४ वाजता नातेवाइकांनी पाचोड ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.