एमएसएफ जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात घाटी रुग्णालयात तरुणाला मारहाण करून लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:06 IST2025-11-22T16:04:18+5:302025-11-22T16:06:44+5:30
गुरुवार रात्रीची घटना, बेगमपुरा पोलिसांकडून चार टवाळखोरांना अटक

एमएसएफ जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात घाटी रुग्णालयात तरुणाला मारहाण करून लुटले
छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या प्रसूतीसाठी घाटीत थांबलेल्या दौलत जंगले (३८, रा. कानेगाव, फुलंब्री) यांना रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये चौघांनी मारहाण करून लुटले. गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेत शुक्रवारी बेगमपुरा पोलिसांनी चार टवाळखोरांना अटक केली. मात्र, वाहन व इतर सुरक्षेसाठी तैनात एमएसएफ जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रेम राजेंद्र सिसोदे (१९), यश विनोद सूर्यवंशी (२०, दोघे रा. बेगमपुरा), आकाश बबन रामफळे (२१), बलराम दीपक जाधव (२१, दोघे रा. घाटी कर्मचारी वसाहत) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जंगले यांच्या पत्नीला बुधवारी प्रसूतीसाठी घाटीत दाखल करण्यात आले. पहाटे प्रसूती झाली. त्यामुळे गुरुवारी जंगले पत्नीच्या देखभालीसाठी रुग्णालयातच थांबले होते. गुरुवारी रात्री नातेवाईक डबा घेऊन येणार असल्याने ते पार्किंगमध्ये वाट पाहत होते. अचानक चौघांनी त्यांना चाकू दाखवून धमकावले. हातातील चांदीचे ब्रेसलेट, १२०० रुपये काढून घेतले. जंगले यांनी विरोध करताच मारहाण केली. झटापटीत जंगले यांनी सूर्यवंशीला पकडून ठेवले. तिघे पळून गेले.
चौकीत नेले अन् उर्वरित तिघेही पकडले
सूर्यवंशीला पकडून जंगले यांनी घाटी पोलिस चौकीत नेले. तेथे बेगमपुरा पोलिसांचा ‘पाहुणचार’ मिळाल्यानंतर त्याने साथीदारांची नावे सांगितली व पोलिसांनी शुक्रवारी सकाळपर्यंत त्यांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपनिरीक्षक मारोती मदेवाड तपास करत आहेत.
एमएसएफ जवानांच्या सुरक्षेत घडला प्रकार
गेल्या काही दिवसांपासून घाटी रुग्णालयात एमएसएफ जवानांची कडेकोट गस्त आहे. पार्किंगमध्येच वाहने लागली पाहिजेत, बंदी असलेल्या भागात न जाऊ देण्यासाठी ते दिवसभर तैनात असतात. तरीही ही लूटमार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या यशला तीन महिन्यांपूर्वी टाऊन हॉल परिसरात तोंडात चाकू खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. जुन्या वादातून हा प्रकार झाला होता.