अवघ्या तीनशे रुपयांतच बांधली रेशीमगाठ; ऑनलाइनही भरू शकता 'नोंदणी विवाह' अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:51 IST2025-01-03T18:51:27+5:302025-01-03T18:51:39+5:30
ना बॅन्डबाजा, ना शाही थाट; पालकांची संमती नसल्यास काय?

अवघ्या तीनशे रुपयांतच बांधली रेशीमगाठ; ऑनलाइनही भरू शकता 'नोंदणी विवाह' अर्ज...
छत्रपती संभाजीनगर : हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड आलेला आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो आहे. असे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मागील वर्षभरात सुमारे ६६७ जोडप्यांनी विवाह बॅण्डबाजा, शाही थाट न करता ३०० रुपये खर्चाच्या आत नोंदणी कार्यालयात रेशीमगाठ बांधली. एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक नोंदणी विवाह झाले. कमी खर्चात, कमी गर्दीत आणि कायदेशीररीत्या प्रक्रियेमुळे नाेंदणी विवाह करणाऱ्यांचा आकडा वाढतो आहे.
‘डेस्टिनेशन वेडिंग’चे बजेट ५० लाखांपर्यंत!
डेस्टिनेशन वेडिंगचे बजेट सध्या ५० लाखांपर्यंत गेले आहेत. भविष्यात यात आणखी वाढ होईल.
कोरोनात लग्नाला फक्त ५० वऱ्हाडी!...
कोरोनात लग्नाला फक्त ५० वऱ्हाडीचे बंधन होते. त्याकाळात नोंदणी विवाहाला अनेकांनी पसंती दिली.
दमछाक नकोय; नोंदणी विवाहाला अनेकांची पसंती ...
गर्दी, खर्च, धावपळ नको असणारी मंडळी नोंदणी विवाहाला पसंती देत असल्याचे आकड्यांवरून दिसते आहे.
वर्षभरात किती जोडप्यांनी नोंदणी विवाह केला?
महिना..... विवाह
जानेवारी - ६०
फेब्रुवारी - ५६
मार्च - ५३
एप्रिल - ७७
मे - ६०
जून - ५९
जुलै - ५४
ऑगस्ट - ४८
सप्टेंबर - ३१
ऑक्टोबर - ५१
नोव्हेंबर - ६४
डिसेंबर- ५४
नोंदणी विवाहाला किती खर्च येतो?
३०० रुपयांच्या दरम्यान नोंदणी विवाहाला खर्च येतो.
ऑनलाइनही भरू शकता अर्ज...
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर वधू-वरांना ऑनलाईन नोटीस क्रमांक जातो. ३२ दिवसांनंतर विवाहाची तारीख दिली जाते. त्यानंतर ६० दिवसांच्या आत विवाह करणे गरजेचे असते.
काय कागदपत्रे लागतात?
वधू-वर यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, वधू-वर यांच्या वयाचा, ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा, तीन साक्षीदारांच्या ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा आवश्यक आहे.
पालकांची संमती नसल्यास काय?
वधू-वर सज्ञान असतील तर पालकाच्या संमतीचा मुद्दा नसतो. विवाह नोटीस निघाल्यानंतर कुणी हरकत घेतली तर विवाह प्रक्रिया थांबते.
नाेंदणी विवाहाकडे कल...
खर्च नको म्हणून अनेकांचा नोंदणी विवाहाकडे कल वाढतो आहे. चार वर्षांपासून नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढते आहे.
-विवाह नोंदणी अधिकारी