स्वतंत्र कॅबिन असलेला सुरक्षारक्षकच बनला ‘सिडकोचा अधिकारी’; लाच घेताना रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:43 IST2025-06-18T19:42:35+5:302025-06-18T19:43:15+5:30
भूखंड नोंदणी, चालान देण्याचे काम; दहा वर्षांपासून स्वतंत्र दालन व कपाटदेखील असल्याचे उघड

स्वतंत्र कॅबिन असलेला सुरक्षारक्षकच बनला ‘सिडकोचा अधिकारी’; लाच घेताना रंगेहाथ अटक
छत्रपती संभाजीनगर : भूखंड खरेदीची नोंदणी व चालान काढून देण्यासाठी १ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दिलीप रामराव ढाले (५२) याला एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) मंगळवारी दुपारी १ वाजता रंगेहाथ अटक केली. गेल्या दहा वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून असलेल्या ढालेला सिडको कार्यालयात स्वतंत्र खोली, कपाट देऊन थेट ‘महत्त्वाचे’ काम दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२१ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांनी तिसगावमध्ये काही दिवसांपूर्वी सिडकोचा भूखंड खरेदी केला होता. त्याची नोंदणी करुन चालान काढण्यासाठी तरुण अनेक दिवसांपासून जळगाव रोडवरील सिडकोच्या मुख्य कार्यालयात चकरा मारत होता. मात्र, सिडकाेच्या अधिकाऱ्यांनी त्याला ढालेला भेटण्यास सांगितले. ढालेने दि. १२ जून रोजी त्याला १ हजार रुपयांची मागणी केली. संतप्त तरुणाने याची थेट एसीबीचे अधिक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटोळे यांच्या सूचनेवरून पथकाने खातरजमा केली . एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी सिडको कार्यालयात सापळा रचला. त्यात ढाले १ हजारांची लाच स्वीकारताना अडकला. त्याला अटक करून त्याच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरक्षारक्षकाकडे अधिकाऱ्याचे काम कसे ?
दहा वर्षांपेक्षा अधिक काळ ढाले एकटा मानधनावर सिडको कार्यालयात काम करतो. अन्य अनेक सुरक्षारक्षक बदलले गेले. ढाले मात्र कायम राहिला. त्याला स्वतंत्र छोटे दालन, त्याच्या नावाने असलेले कपाट पाहून एसीबीचे अधिकारीही अवाक झाले. त्या कपाटात अनेक महत्त्वाच्या फाइल, कागदपत्रे होती. त्याची सर्व प्रक्रिया ढालेच पार पाडत होता, हे विशेष. भूखंड, चालानच्या कामासाठी अर्जदारांना त्याच्याकडे का पाठविले जायचे? ढालेवर कोणाचा वरदहस्त आहे? याविषयी कारवाईनंतर चांगलेच तर्कवितर्क लावले जात होते.