धुळ्यातील शाळेचा शिपाईच निघाला अमली पदार्थांचा तस्कर; छत्रपती संभाजीनगरात अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 20:14 IST2025-10-11T20:13:59+5:302025-10-11T20:14:25+5:30
शहरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांना भेटण्यासाठी येताच अटक, पंधरा दिवसाला अलिशान कारमधून पुरवठा

धुळ्यातील शाळेचा शिपाईच निघाला अमली पदार्थांचा तस्कर; छत्रपती संभाजीनगरात अटकेत
छत्रपती संभाजीनगर : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व पातळ औषधांच्या शहरातील तस्करांवर कारवाई सुरू झाल्याने आता दुसऱ्या जिल्ह्यातील तस्कर शहरात सक्रिय झाले आहेत. धुळ्यातील शंभर टक्के अनुदानित एका मोठ्या शाळेतील शिपाईच अमली पदार्थांचा तस्कर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कल्पेश चंदुलाल अग्रवाल (३८, रा. पदमनाभनगर, धुळे) असे त्याचे नाव असून, सय्यद नबी सय्यद लाल (३३, रा. वाळुज) याला भेटण्यासाठी येताच दोघांना अटक करण्यात आली.
आमखास मैदान परिसरात एका अलिशान कारमध्ये गोळ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांना मिळाली होती. त्यावरून पवार यांनी सहायक निरीक्षक विनायक शेळके, रविकांत गच्चे यांच्या पथकासह गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता आमखास मैदानाजवळ सापळा रचला. गुप्तबातमीदाराच्या वर्णनानुसार कार (एम एच -४८ - ए डब्ल्यू - २०१२) येताच पथकाने कार थांबवून अग्रवाल व सय्यद नबीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तपासणीत अग्रवालने चालकाच्या सीटसमोरील भागात १०० गोळ्यांचे लपवलेले पाकिट पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर दोघांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुकुंदवाडीचा तस्कर अजूनही सक्रियच
अग्रवालने चौकशीत धुळ्यात खरेदी केलेल्या आठ बॉक्सपैकी चार बॉक्स सय्यद नबीसह मुकुंदवाडीतील अमली पदार्थांचा कुख्यात विक्रेता ज्ञानेश्वर मनोहर यादव उर्फ माऊली (रा. जयभवानीनगर) याला विकल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, ज्ञानेश्वरवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वरने एनडीपीएस पथकावर हल्ला केला होता. अनेकदा अटक होऊनही काही पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसोबत त्याची सातत्याने उठबस असल्याने त्याचा अमली पदार्थांचा गोरखधंदा अजूनही सुरू असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, धुळ्याचा तस्कर त्याच्या संपर्कात आल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शाळेत शिपाई ते अमली पदार्थांचा तस्कर
मूळ धुळ्याचा असलेला अग्रवाल खासगी संस्थेच्या शंभर टक्के अनुदानित शाळेत शिपाई आहे. त्याच्यासह सय्यद नबीवर २०१८ मध्ये एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात अमली पदार्थांच्याच तस्करीचा गुन्हा दाखल होता, असे पोलिसांनी सांगितले. या औषधांच्या तस्करीसाठी तो मेव्हण्याची अलिशान कार वापरत होता. पोलिसांनी ती कारही जप्त केली. दरम्यान, अग्रवाल व सय्यद नबीला न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक फौजदार दिलीप मोदी, अंमलदार नवनाथ खांडेकर, प्रकाश गायकवाड, अमोल शिंदे, मंगेश शिंदे, सागर पांढरे, संतोष चौरे यांनी कारवाई केली.