ट्रेडिंगमध्ये पैसे बुडाल्याने मित्राच्या नावे परस्पर कर्ज काढले; विश्वासघाती तरुणावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:32 IST2025-08-21T18:20:05+5:302025-08-21T18:32:08+5:30
मित्रावर विश्वास ठेवून मोबाइल दिला, पण त्यानेच ऑनलाइन कर्ज घेऊन फसवले.

ट्रेडिंगमध्ये पैसे बुडाल्याने मित्राच्या नावे परस्पर कर्ज काढले; विश्वासघाती तरुणावर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन ट्रेडिंगच्या नादातून गमावलेले पैसे परत मिळवण्याच्या हव्यासापोटी ३६ वर्षीय तरुणाने मित्राच्याच मोबाइलवरून परस्पर ऑनलाइन कर्ज घेत ५८ हजारांचा गंडा घातला. या फसवणुकीची मित्राने थेट पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर नसीर बिरादर खान (३६, रा. बायजीपुरा) याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
३० वर्षीय राहुल प्रकाश औचरमल (३०) हे व आरोपी नसीर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एकाच कंपनीत सोबत काम करत होते. त्यादरम्यान मैत्री वाढत जात विश्वास वाढत गेल्याने अनेकदा राहुल यांचा मोबाइल नसीरकडे असायचा. यावेळी नसीरने राहुल यांचे ऑनलाइन पेमेंट ॲपचा पासवर्ड मिळवून त्याद्वारे विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत रक्कम स्वत:च्या बँक खात्यात वळती केली. अशी ५८ हजार ८२१ रुपयांची थकबाकी झाल्यानंतर फायनान्स कंपन्यांकडून राहुल यांना कॉल, मेसेज प्राप्त होणे सुरू झाले. त्यांनी याबाबत चौकशी केल्यानंतर हा प्रकार नसीरने केल्याचे निष्पन्न झाले. मित्राकडूनच झालेल्या फसवणुकीमुळे संतप्त राहुल यांनी एमआयडीसी सिडकाे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे यांनी नसीरवर गुन्हा दाखल केला.
ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गमावले पैसे
नसीरला गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन ट्रेडिंगचा नाद लागला होता. त्यात तो हजारो रुपये गमावून बसला. मात्र, तरीही नफा कमावण्याच्या हव्यासापोटी त्याने हा प्रकार सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.