छत्रपती संभाजीनगरात टी शर्टवरून रील्स स्टारमध्ये जोरदार राडा; कॅफेमध्ये केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:15 IST2025-05-07T14:14:31+5:302025-05-07T14:15:11+5:30
याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरात टी शर्टवरून रील्स स्टारमध्ये जोरदार राडा; कॅफेमध्ये केली तोडफोड
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या रील स्टार्सने क्रांतीचौक परिसरातील एका कॅफेमध्ये जोरदार राडा केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात रील स्टार्सविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
अरुण तुपे, पवन तुपे आणि एका अनोळखीचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आशिष हरिश सोनवणे (रा. बालाजीनगर ) आणि श्वेता तोगलवार हे दोघे भागिदारीमध्ये क्रांतीचौक परिसरात इंजिनिअर्स फूड कोर्ट कॅफे चालवितात. शिवाय ते दोघेही रिल स्टार आहे. अरुण, पवन तुपेही रिल स्टार्स आहेत. यामुळे आरोपी आणि तक्रारदार हे परस्परांना चांगले ओळखतात. रविवारी आशिष आणि श्वेता कॅनॉट प्लेस येथे रील बनविण्यासाठी गेले असता टी शर्टवरून त्यांच्यात आरोपींसोबत वाद झाला होता.
या वादानंतर आशिष आणि श्वेता तेथून निघून त्याच्या कॅफेमध्ये गेले. काही वेळानंतर रात्री ९ वाजता अरुण तुपे, पवन तुपे आणि एक अनोळखीचा आरोपी तेथे गेले. त्यांनी कॅनॉट प्लेसमधील वादातून कॅफेत तोडफोड करीत तक्रारदार यांना मारहाण केली. या घटनेत आशिष यांच्या डोक्याला जखम झाली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.