भरधाव दुचाकीच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडी ठार
By बापू सोळुंके | Updated: May 17, 2023 21:07 IST2023-05-17T21:07:32+5:302023-05-17T21:07:46+5:30
याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

भरधाव दुचाकीच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडी ठार
छत्रपती संभाजीनगर: आईचे बोट धरून रस्ता ओलांडणाऱ्या पाच वर्षिय बालिकेला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव रोडवरील आंबेडकरनगरसमोर मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
अन्वी प्रताप मोरे (५,रा. फुलेनगर, सिडको एन ७)असे मरण पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, अन्वी ही मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तिच्या आईसह आंबेडकरनगरकडून सिडको एन ७ कडे पायी रस्ता ओलांडत होती. यावेळी चिमुकलीने आईच्या हाताचे बोट सोडून ती तिच्या मागेपुढे चालत असतानाच सिडको बसस्टॅण्डकडून हर्सूल टी पॉईंटकडे भरधाव मोटारसायकलचालकाने अन्वीला जोराची धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की, अन्वी गंभीर जखमी होऊन घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या घटनेंतर तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी अन्वीला तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी सिडको पाेलीस ठाण्यात दुचाकीचालकाविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी दुचाकीचालकाविरोधात अन्वीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविला.