छत्रपती संभाजीनगरजवळ निर्मनुष्य परिसरात थाटला जीवघेण्या बनावट गुटख्याचा कारखाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:55 IST2026-01-02T19:54:27+5:302026-01-02T19:55:41+5:30
ट्रान्सपोर्टद्वारे कच्च्या मालाचा पुरवठा, मुंब्र्याहून मजुरांसह शहरात येऊन तयार करत होते पक्का माल

छत्रपती संभाजीनगरजवळ निर्मनुष्य परिसरात थाटला जीवघेण्या बनावट गुटख्याचा कारखाना
छत्रपती संभाजीनगर : पडेगावच्या निर्मनुष्य परिसरात भाडेतत्त्वावर घर घेऊन पूर्वी गुटखा व अन्य प्रतिबंधित सुगंधी सुपारीची विक्री करणाऱ्याने जीवघेण्या बनावट गुटख्याचा कारखानाच उघडला होता. ३१ डिसेंबर रोजी रात्री गुन्हे शाखेने त्याच्या या कारखान्यात धाड टाकून शेख इर्शाद शेख शहेजाद (३५, रा. हर्सुल, जटवाडा) याला अटक केली. तसेच कच्चा माल व यंत्रसाम्रगी जप्त केली.
काही महिन्यांपासून मुंबईतील एक गुटखा तस्कर शहरात येऊन बनावट गुटखा तयार करुन घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांना प्राप्त झाली होती. दि.३१ रोजी रात्री मेनकुदळे यांनी सहकाऱ्यांसह पडेगावच्या गट क्रमांक ८२ मधील या घरावर छापा टाकला. तेव्हा इर्शाद तेथे आढळला. त्यानंतर अन्न व सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांच्या तपासणीत या घरात बनावट गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सापडले. इर्शादवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
यंत्रसाम्रगीची खरेदी, १५ लाखांची गुंतवणूक
चौकशीत इर्शादने ठाण्याच्या मुंब्रा येथील तय्यद मुंबईवाला याच्या मदतीने हा बनावट गुटख्याचा कारखाना टाकल्याची कबुली दिली. दोघांनी मिळुन जवळपास १५ लाखांची गुंतवणूक केली. यासाठी आवश्यक सुगंधासाठीचे रसायन, दर्जाहीन कच्ची सुपारी, तंबाखू थेट ट्रान्सपोर्टवरुन शहरात मागवत होते. माल शहरात येताच मुंबईवाला मुंब्र्याहून मजूर घेऊन शहरात येत होता. त्यानंतर सर्व मिळून पडेगावच्या घरात बनावट गुटखा तयार करून मुंबईला रवाना होत होते. यासाठी लागणारे पॅकिंग मशिन, वजन काटा, विविध गुटखा व अन्य सुगंधी तंबाखूच्या नावाचे रॅपरचे बॉक्स गुजरात, बिहारहून खरेदी करत होते. दरम्यान, अन्न व औषधी प्रशासनाने सदर घर सील केले. उपनिरीक्षक सचिन गाडेकर अधिक तपास करत आहेत.