तडीपार गुन्हेगार छत्रपती संभाजीनगरात आला, ज्याने घरी सोडले त्यालाच मारहाण करून लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:48 IST2025-11-27T15:47:12+5:302025-11-27T15:48:59+5:30
मुकुंदवाडीत लुटमारीचा चौथा दिवस : दोन वर्षांसाठी हद्दपार असताना आरोपी हद्दीत आला

तडीपार गुन्हेगार छत्रपती संभाजीनगरात आला, ज्याने घरी सोडले त्यालाच मारहाण करून लुटले
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत लुटमार, प्राणघातक हल्ल्यांच्या घटना सातत्याने सुरू असून, पुन्हा एकदा रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराने शहरात प्रवेश केला. सोबतच्या एका तरुणाला बेदम मारहाण केली.
जितेंद्र श्रीमंत दीक्षित (रा. प्रकाशनगर) असे आरोपीचे नाव आहे. जितेंद्र पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सततच्या गुन्ह्यांमुळे त्याला दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. २४ नोव्हेंबर रोजी तो शहरात परतला. योगेश पांडुरंग बोरुडे (२५, रा. दुधड)या तरुणाला भेटला. रात्री जितेंद्रने योगेशला घरी सोडण्याची विनंती केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास योगेशने त्याला प्रकाशनगरमध्ये सोडले. मात्र, तेवढ्यात जितेंद्रने त्याला मारहाण केली. त्याच्याकडील १५,५०० रुपये हिसकावून घेतले. मोबाइल देखील हिसकावला. पुन्हा मारहाण करून पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. २५ नोव्हेंबर रोजी योगेशने मुकुंदवाडी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर दुपारी जितेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर अधिक तपास करत आहेत.
वेदांतनगरमध्ये अज्ञाताचा तरुणावर हल्ला
शहरात सातत्याने शस्त्रे उपसली जाऊन प्राणघातक हल्ले, लुटमारीच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाळूज, एमआयडीसी वाळूज, पुंडलिकनगर, मुकुंदवाडीनंतर आता वेदांतनगर परिसरात एका अज्ञाताने पैशांसाठी तरुणावर हल्ला केला. रेल्वेस्थानक औद्योगिक वसाहतीत राहणारे सचिन मगरे (३३) हे २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजता घरी जात असताना एका अज्ञाताने त्यांना अडवले. नशा करण्यासाठी पैशांची मागणी केली. मगरेंनी त्याला नकार देताच त्याने हल्ला चढवला. डोक्यात वार करून जखमी केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.