डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात गावांतील ८ हजार एकर जमीन होणार संपादित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:34 IST2025-05-24T19:33:09+5:302025-05-24T19:34:08+5:30
शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये १० हजार एकर जमीन संपादित करण्यात आली होती.

डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात गावांतील ८ हजार एकर जमीन होणार संपादित
छत्रपती संभाजीनगर: एमआयटीएल ( ऑरिक सिटी) अंतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर (डीएमआयसी)च्या बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील औद्योगिक जमीन संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर बिडकीन डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी, लगतच्या ७ गावांतील ८ हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये १० हजार एकर जमीन संपादित करण्यात आली होती. यात शेंद्र्यांमध्ये २ हजार एकर तर बिडकीनसह लगतच्या गावांतील ८ हजार एकर जमिनीचा समावेश होता. ऑरिक सिटीने पहिल्या टप्प्यात शेंद्रा औद्योगिक झोनमधील भूखंड विक्री केले. तेथे आता केवळ १०० एकरचा एकमेव भूखंड उरला आहे. यामुळे गतवर्षीपासून ऑरिकने बिडकीन औद्योगिक पट्ट्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले होते. ऑरिकमधील इंडस्ट्रीयल वापराकरिता असलेल्या एकूण जमिनीपैकी ९० टक्के जमीन विविध उद्योगांना वाटप झाली आहे. एमएसएमईंनीही बिडकीनसाठी भूखंडाची मागणी केली. बिडकीन डीएमआयसीमध्ये भूखंड कमी पडत असल्याचे निदर्शनास येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वी एका कार्यक्रमात येथे आणखी ८ हजार एकर जमीन संपादित करण्याची घोषणा केली होती. डीएमआयसीकरीता नोटीफाइड गावांतील ही जमीन घेतली जाणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे यांनी दिली. ते म्हणाले की, चिते पिंपळगाव, चितेगाव, खोडेगाव, घारदोन, घारदोन तांडा आणि गाडीवाट या गावांतील ही जमीन घेतली जाईल.
मोठ्या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे भूखंडाची मागणी वाढली
टोयटा-किर्लोस्कर मोटार्स, लुब्रिझोल इंडिया, एथर एनर्जी आणि जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या मोठ्या कंपन्यांनी बिडकीन डीएमआयसीमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यानंतर आणखी मध्यम उद्योगातील २२ कंपन्यांनी तेथे भूखंडाची मागणी केली होती..