छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने मृत्यूचे तांडव; काका, पुतणीसह गर्भातील बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:40 IST2025-12-25T13:39:16+5:302025-12-25T13:40:58+5:30
तिघांच्या मृत्यूला चालकाचा बेजबाबदारपणा कारण; वेगवान कारचे सिसिटीव्ही फुटेज पाहून पोलिसही हबकले

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने मृत्यूचे तांडव; काका, पुतणीसह गर्भातील बाळाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री भरधाव आलिशान कारने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत काका, पुतणीसह जखमी गरोदर मातेचे गर्भातील बाळही दगावले. हा अपघात करणारा बेजबाबदार चालक कश्यप विनोद पटेल (वय ३३, रा. कुशलनगर) याने आकाशवाणी चौक ते मोंढा नाका उड्डाणपूल हे अर्धा किलोमीटर अंतर अवघ्या १८ सेकंदांत वाऱ्याच्या वेगाने पार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले. कारचा हा वेग पाहून क्षणभर पोलिसही हबकले.
अब्दुल्ला अबित अब्दुल्ला मुजीब हे २० डिसेंबर रोजी रात्री ९:१५ वाजता मावशी अजराबानू जेधपूरवाला, मावशीचा मुलगा अख्तर रजा, अहमद रजा, मुली उजमा बानो व जेबा बानो, सून अलिझा, नात जोहरा व तीन बालके सिडको कामगार चौकाजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर अहमद रजा आणि त्याची बहीण जेबा बानो हे दोघे स्कूटीवर, तर उर्वरित सर्वजण मोहंमद बारी यांच्या रिक्षाने जुना बाजारातील घराकडे निघाले होते. अहमद रजा यांची दुचाकी पुढे, तर रिक्षा मागे होती. मोंढा नाका उड्डाणपुलावरून जाताना मागून कारने रिक्षाला धडक दिली. रिक्षातील अख्तर रजा उंच उडून उड्डाणपुलावरून थेट खाली रस्त्यावर कोसळले. दुचाकीवरील अहमद रजा यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, अख्तर आणि जोहरा यांचा मृत्यू झाला; तर अलिझा ही सात महिन्यांची गर्भवती होती. तिच्या पोटातील बाळही दगावले.
प्लायवूडचा व्यवसाय
कश्यपचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. अपघातानंतर त्याने जखमींना मदत करण्याऐवजी कारमधील तीन मुलींसह पळ काढला. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी चालक कश्यप विनोद पटेल (३३, रा. कुशलनगर) याला अटक करून २१ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी उपनिरीक्षक खिल्लारे यांनी पुन्हा त्याला न्यायालयात नेले असता २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी वाढली.