मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टर शेती पाण्यात; नुकसानभरपाई अडकली बँकेच्या केवायसीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:45 IST2025-09-30T17:41:35+5:302025-09-30T17:45:02+5:30
शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतरच मिळणार नुकसानीची मदत

मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टर शेती पाण्यात; नुकसानभरपाई अडकली बँकेच्या केवायसीमध्ये
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ३१ लाख ९८ हजार ४६७ हेक्टर शेती सध्या पाण्यात आहे. त्यातील २३ लाख ६० हजार ३६८ हेक्टवरील नुकसानीचे पंचनामे झाले असून, १८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी शासनाने दिलेल्या १५०० कोटींच्या नुकसानभरपाईचे वाटप प्रशासकीय पातळीवर सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन केवायसी केल्यानंतरच भरपाई मिळेल, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
आयुक्त पापळकर म्हणाले, मागील २ दिवस पावसाचे मोठे संकट होते. सध्या पाऊस थांबला आहे. पुढील ४ दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा दावा आयुक्तांनी केला.
आतापर्यंत १५०० कोटींपेक्षा अधिक मदतनिधी आला असून, याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. व्हीकेएन नंबर याद्या गावनिहाय प्रसिद्ध होतील. १८ व २३ सप्टेंबर रोजी दोन आदेशानुसार १५०० कोटी आले आहेत. जून, जुलै, ऑगस्टमधील नुकसानीची ही मदत आहे. शेतकऱ्यांना बँकेत जावे लागेल. शेती व शेतकरी यामध्ये वारंवार बदल होतात, त्यामुळे केवायसी बंधनकारक आहे. बँकांनी कुठल्याही कर्जाच्या हप्त्याची कपात करून घेऊ नये, हा मदतनिधी आहे. जर ऑटो पे असा नियम काही बँकांचा असेल तर तेथे शेतकऱ्यांनी अर्ज देऊन रक्कम कपात करू नये, असे सांगावे. मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रांचे पथक येणार आहे का, याबाबत विचारले असता विभागीय आयुक्तांनी अद्याप तरी पथक येण्याबाबत माहिती प्राप्त नसल्याचे नमूद केले. यावेळी अपर आयुक्त खुशालसिंग परदेशी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची उपस्थिती होती.
२४ हजार ७०० लोकांचे स्थलांतरण
जायकवाडीतील विसर्गामुळे प्रशासकीय यंत्रणेने २४ हजार ७०० लोकांचे स्थलांतरण केले. १७ हजार ७८५ निवारागृहात आहेत, तर ६ हजार ७८१ घरी पोहोचले आहेत. सध्या पुरात कुणीही अडकलेले नाही. विभागात इंटरनेट, वीज पुरवठ्याबाबत धाराशिव, लातूरमधून काही तक्रारी होत्या, असेही आयुक्तांनी सांगितले.
कोणत्या जिल्ह्यात किती शेती पाण्याखाली?
जिल्हा......................................शेती हेक्टरमध्ये
छत्रपती संभाजीनगर.....................२३६५२८
जालना...............................२३२०८२
परभणी...............................२७३०३३
हिंगोली.....................................२७३४१३
नांदेड..................................६५४४०१
बीड.................................६७५८९१
लातूर.............................४०३४३८
धाराशिव.....................४४९६८१
एकूण.......................३१९८४६७