२००६ पैठण पूर: २० व्यापारी अडकले; मदतीसाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:41 IST2025-09-30T12:40:19+5:302025-09-30T12:41:18+5:30
‘आम्ही दुकानांवर अडकलो, वाचणे कठीण, हा शेवटचा कॉल समजा’; सहा तास पाण्याने वेढलेले, व्यापाऱ्यांनी सांगितली २००६ मधील आपबिती

२००६ पैठण पूर: २० व्यापारी अडकले; मदतीसाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना फोन
- राहुल जगदाळे
छत्रपती संभाजीनगर : आम्ही बसस्थानक व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर आम्ही २० जण अडकलो होतो. त्याचवेळी धरणातून आणखी विसर्ग वाढवून तीन लाखांवर करण्यात येणार असल्याचे कळाले. आता आमचे काही खरे नाही, वाचणे कठीण आहे, हा आमचा शेवटचा कॉल समजा, असे मित्रांना कळवूनही टाकले होते, अशी २००६ मधील आपबिती आणि सहा तासांचा थरार पैठणच्या व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना कथन केली.
पैठण शहर व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया यांनी २००६ मधील परिस्थितीला उजाळा दिला. ते म्हणाले, जायकवाडीतून अडीच लाख विसर्ग करणार असल्याचे प्रशासनाने सकाळी अचानक सांगितले. कोणालाच किती पाणी येईल, याचा अंदाज नव्हता. आमच्या वडिलांनी १९९१ मध्ये महापुरातही शहरात जास्त पाणी शिरले नव्हते. त्यामुळे दुकाने पाण्याखाली जातील, याची अपेक्षाच नव्हती. केवळ तीन फूट पाणी येईल, असे वाटले होते. परंतु, आमची दुकानेच पाण्याखाली गेली होती. त्यामुळे बसस्थानक व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावरील नातेवाईक, मित्रांच्या दुकानांत शक्य तेवढे साहित्य, माल हलवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. आम्ही संकुलावर अडकलो. दुपारनंतर जायकवाडीतून ३ लाख विसर्ग करणार असल्याचे कळाले. त्यामुळे स्वाभाविक भीती वाटली. त्याचवेळी आमच्यापैकी काहींकडे असलेल्या मोबाइलवरून नातेवाईक, मित्रांना कॉल करू लागलो. आता आम्ही काही परतत नाही. हा आमचा शेवटचा कॉल समजा, असे सांगूनही टाकले होते, असे लोहिया म्हणाले.
मदतीसाठी थेट विलासरावांना फोन
बसस्थानक व्यापारी संकुलावर २० व्यापारी अडकले आहेत, त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यासाठी थेट तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी फोन केला. देशमुख यांनी व्यवस्था करतो, असे सांगितले. परंतु, सुदैवाने विसर्ग वाढविला गेला नव्हता शिवाय, कहार समाजाच्या होड्यांच्या मदतीने प्रशासनाने आम्हाला सोडवले. हा सहा तासांचा थरार आजही अंगावर शहारा आणतो, असे लोहिया म्हणाले.