मनपाचे २ हजार कंत्राटी कर्मचारी पाच महिन्यांपासून विनापगारी; दसरा गेला, दिवाळी गोड होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:14 IST2025-10-07T14:13:03+5:302025-10-07T14:14:01+5:30
दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची जबाबदारी मुख्य लेखाधिकारी वाहुळे यांच्यावर

मनपाचे २ हजार कंत्राटी कर्मचारी पाच महिन्यांपासून विनापगारी; दसरा गेला, दिवाळी गोड होणार
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील २ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार मागील पाच महिन्यांपासून झाला नाही. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. दसरा तसाच गेला. आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची जबाबदारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्यावर सोपविली.
मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सीचे आणि प्रशासनाचे सध्या नोटीस वॉर सुरू आहे. त्यामुळे दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची हेळसांड होत आहे. एजन्सी पगार करीत नसल्याने प्रशासकांनी अन्य दोन छोट्या एजन्सींकडे कर्मचारी वर्ग केले. कर्मचारी वर्ग करताना दोन्ही एजन्सींनी दोन महिन्यांचा ॲडव्हान्स पगार करण्यास होकार दर्शविला होता. आता पगार देण्याची वेळ आल्यावर दोन्ही एजन्सींनी माघार घेतली. एक महिन्याच्या पगारासाठी किमान ५ कोटी रुपये लागतात.
काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला घामाचा पगार तरी द्यावा म्हणून कामबंद आंदोलनही केले. विभागप्रमुखांच्या बैठकीत सोमवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची जबाबदारी वाहुळे यांच्यावर सोपविली. वाहुळे आता कोणता मार्ग काढतात, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
निविदा प्रक्रियेला ब्रेक
मनुष्यबळ पुरविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या. ८ पेक्षा अधिक एजन्सींनी निविदा भरल्या. मात्र, ही प्रक्रिया थांबविण्यात आली. नवीन एजन्सी नियुक्त केल्या असत्या तर किमान दोन महिन्यांचा पगार करण्याचे दायित्व त्यांच्यावर टाकता आले असते.