दमदार पावसाने आवक वाढली, १७ दिवसांतच जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:49 IST2025-08-21T11:48:54+5:302025-08-21T11:49:23+5:30

मोठ्या प्रमाणावर आवक असल्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

18 gates of Jayakwadi Dam reopened within 17 days; Alert issued to citizens along Goda | दमदार पावसाने आवक वाढली, १७ दिवसांतच जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले

दमदार पावसाने आवक वाढली, १७ दिवसांतच जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले

- दादासाहेब गलांडे
पैठण (छत्रपती संभाजीनगर ):
जायकवाडी धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नाशिक येथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आवक वाढून धरणाची पाणी पातळी आज, गुरुवारी पहाटे ९५.३२ टक्क्यांवर पोहचली. त्यामुळे प्रशासनाने सकाळी ६ वाजता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले. सध्या गोदावरी पात्रात ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर आवक असल्याने विसर्ग देखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आज पहाटे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५.३२ टक्क्यांवर पोहोचला. धरणाची पाणी पातळी १५२१.१५ फुटावर पोहोचली आहे. तर धरणाचा जिवंत पाणीसाठा २०६९ .४३५ दलघमी आहे. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक २ हजार ८०३ क्युसेक आहे. यामुळे प्रशासनाने सर्व १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळी ६ वाजता सर्व दरवाजे उघडून ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग गोदापात्रात करण्यात येत आहे. 

वाढती आवक, विसर्ग वाढणार
वरच्या धरणातून होणारी पाण्याची आवक बघता आज दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान सर्व १८ दरवाजे आणखी एक फुटाने वर करण्यात येणार आहेत. यामुळे १८ दरवाजे दीड फुटाने उचलून एकूण २८ हजार २९६ क्युसेक वेगाने गोदापात्रा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. 

गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे
धरण परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे, तसेच नाशिक येथून देखील मोठ्या प्रमाणावर आवक धरणात येत असल्याने गोदापात्रात आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील गोदापात्र परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे . पैठणतालुक्यातील  नागरिकांनी सतर्क राहुन कोणीही  गोदापत्रात जाऊ नये असे आवाहन पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे.

महिनाभरात दुसऱ्यांदा उघडले दरवाजे
आवक वाढून धरण भरल्याने ३१ जुलै रोजी जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते जलपूजन करून उघडण्यात आले होते. तर चार ऑगस्ट रोजी दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा धरणाचे दरवाजे उघडून मोठा विसर्ग करण्यात येत आहे.

Web Title: 18 gates of Jayakwadi Dam reopened within 17 days; Alert issued to citizens along Goda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.