प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गावकऱ्यांचा एल्गार

By Admin | Updated: December 13, 2014 01:23 IST2014-12-13T01:23:25+5:302014-12-13T01:23:25+5:30

तालुक्यातील नान्होरी हे गाव मोठे आणि महत्वाचे समजल्या जाते. या गावालगत १६ ग्रामपंचायती आहेत.

Village Health Center for Primary Health Center | प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गावकऱ्यांचा एल्गार

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गावकऱ्यांचा एल्गार

ब्रह्मपुरी : तालुक्यातील नान्होरी हे गाव मोठे आणि महत्वाचे समजल्या जाते. या गावालगत १६ ग्रामपंचायती आहेत. असे असताना अद्यापही या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात न आल्याने नान्होरीसह परिसरातील गावांतील नागरिकांची उपचारासाठी पायपीट होत आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.
जुन्या काळात व आजही नान्होरी हे अनेक सामाजिक उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. अनेक पिढ्या या गावात शिकून मोठ्या झाल्या आहेत. अशा नान्होरी गावावर लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेद्वारा सातत्याने अन्याय करण्यात आला आहे. नान्होरी या मुख्य गावापासून दोन ते पाच किलोमिटर अंतरावर चहुबाजुने १६ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नान्होरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती व्हावी, अशी जुनी मागणी आहे. मात्र या मागणीकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी नान्होरीचे उपसरपंच संजय शेंडे यांच्यासह गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
भौगोलिकदृष्ट्या नान्होरी हे गाव मध्यवर्ती ठिकाण आहे. नान्होरीच्या सभोवतालदोन ते पाच किमी अंतरावर १६ गावे वसलेली आहेत. परंतु या सर्व गावांना सर्वसाधारण व गंभीर आजारावरील उपचारासाठी १५ ते २० किलोमिटरचा प्रवास करुन जावे लागत आहे. नान्होरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १६ ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन तो चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे एक वर्षापूर्वीच पाठविला आहे. गावकऱ्यांनी अनेक लोकप्रतिनिधींकडे या समस्यांचे निवेदनही दिले. परंतु अद्यापही ही मागणी पूर्णत्वास आली नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. साथीचे रोग अथवा अचानक ईजा झाल्यास हे नान्होरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वांसाठी सोयीचे ठरु शकते. त्यामुळे तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी मंजूर करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच संजय शेंडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Village Health Center for Primary Health Center