चिचडोह प्रकल्पामुळे भेंडाळावासीय तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:01:41+5:30

भेंडाळा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या या गावापासून पाच किमी अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.

The thriving locals are thirsty for the Chichdoh project | चिचडोह प्रकल्पामुळे भेंडाळावासीय तहानलेले

चिचडोह प्रकल्पामुळे भेंडाळावासीय तहानलेले

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात पाणीटंचाई : नियोजनशून्यतेमुळे गावात समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : चिचडोह बॅरेजसाठी वैनगंगा नदीचे पाणी अडविल्याने चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गावातील नळ पाणीपुरवठा योजना निकामी ठरली असून या गावात आठवड्यातून एक ते दोन दिवस पाणी पुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्यतेमुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
भेंडाळा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या या गावापासून पाच किमी अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी वाघोली येथील वैनगंगा नदीवर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ४० हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. दोन्ही योजना मिळून एकूण ९० हजार लिटर क्षमतेची नळ योजना आहे. सद्यस्थितीत नवीन वाढीव पाणी योजना सुरू असून या योजनेतून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. चिचडोह बॅरेजमध्ये पाणी अडविल्याने भेंडाळा येथील वैनगंगा नदीचा जलस्तर घटला आहे. त्यामुळे आठवड्यातून एक ते दोन दिवस गावातील नळाला पाणी येत आहे. अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने गावातील महिला, पुरूष, लहान मुले, मुली सार्वजनिक विहीर व हातपंपावर पाण्यासाठी गर्दी करीत आहेत. अशा स्थितीत ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी उपाययोजना करण्याची अपेक्षा गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
एप्रिल महिन्यात गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून वेळीच उपाययोजना केली नाही तर मे व जून महिन्यात मोठे पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या दोन महिन्यात तापमान वाढत असतो. ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करून पाणी समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

वाढीव पाणी योजनेच्या इन्टेक वेलमध्ये नदीपात्रातून कमी प्रमाणात पाणी येत आहे. टाकीतील अल्प पाणी संपूर्ण गावाला एकाचवेळी पुरत नाही. त्यामुळे तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या योजनेची मोटार नादुरूस्त असून तंटामुक्त समितीच्या निधीतून दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. चिचडोह बॅरेजसाठी पाणी अडविल्याने इकडे परिणाम झाला आहे.
- वनीता पोरेड्डीवार, सरपंच, ग्रा.पं.भेंडाळा

Web Title: The thriving locals are thirsty for the Chichdoh project