Support of Human Development Mission to rural students | ग्रामीण विद्यार्थिनींना मानव विकास मिशनचा आधार
ग्रामीण विद्यार्थिनींना मानव विकास मिशनचा आधार

ठळक मुद्देखासगी शाळाही देत आहेत सेवा : पालकांची चिंता मिटली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुलगी शिकली तर प्रथम घराची आणि त्यानंतर गाव, जिल्हा आणि राज्याची प्रगती होते. मात्र काही पालक सोडले तर, मुलींच्या शिक्षणाकडे आजही पाहिजे तसे लक्ष देत नाही. मुलींचा शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा त्यांना दर्जेदार शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशनतर्फे मोफत बस सेवा सुरु करून शाळेपर्यंत पोहचून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याअंतर्गत चंद्रपूर विभागांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी लाभ घेत आहेत.
ग्रामीण आणि अतीदूर्गम भागात पाहिजे तशा आजही शिक्षणाच्या सुविधा नाही. दिवसेंदिवस घटत असलेल्या अनुचित घटनांमुळे पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी असुरक्षिततेची भावना आहेत. विद्यार्थिंनींच्या बाबतीत तर, पालकांमध्ये अधिकच भिती आहे. त्यामुळे शिक्षणाची आवड असूनही अनेक विद्यार्थींनी शिक्षणापासून वंचित राहतात. प्रत्येक विद्यार्थिंनींना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण मिळावे, त्यांना सुरक्षितता मिळावी, सोबतच पालक आणि समाजानेही मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत बस सेवा सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थिंनींच्या शाळेत येण्या-जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात ही सेवा पुरविण्यात येत आहेत. यासाठी एसटी महामंडळाने शाळा सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत या बसेस सुरु केल्या आहेत. पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थिंनींना ही बस सेवा मोफत असल्याने अतिदुर्गम भागातील विद्यार्थिंनीही शहरात येऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहºयावरील आनंद वाखाण्याजोगा आहे. मात्र काही मार्गावर या बसेस वेळेवर पोहचत नसल्याने काही विद्यार्थिंनींना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्ता निश्चितीसाठी समिती
मानव विकास मिशन अंतर्गत विभागाला मिळालेल्या बसच्या कोणत्या मार्गाने फेऱ्या द्यायच्या यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिक्षणाधिकारी, आगार प्रमुख, मुख्याध्यापक यांचा समावेश आहे.

दररोज फिरणाऱ्या या बसमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिंनींना प्राधान्य दिल्या जाते. त्यानंतर जागा असल्यास अन्य प्रवाशांना घेतल्या जाते. मात्र विद्यार्थिंनींच्या शाळेची वेळ चुकणार नाही, याची जबाबदारी चालक-वाहकांची आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, मूल, सावली, नागभिड, राजुरा, जिवती, चिमूर, सिंदेवाही, वरोरा, गोंडपिपरी तर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, आरमोरी, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, भामरागड, मूलचेरा, सिंरोंचा या तालुक्यांचा समावेश आहे.


Web Title: Support of Human Development Mission to rural students
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.