Misconceptions are spreading due to rumors about Corona | कोरोनाबाबतच्या अफवांमुळे पसरताहेत गैरसमज

कोरोनाबाबतच्या अफवांमुळे पसरताहेत गैरसमज

ठळक मुद्देप्रशासनाला सहकार्य करा-जिल्हाधिकारी : समाजमाध्यमांवर अफवांवर पसरविण्यांवर कारवाईच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : कोरोना विषाणू संदर्भात समाज माध्यमांमध्ये अफवा पसरल्या जात आहेत. यापुढे अशा अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी न घाबरता स्वत:ची, कुटुंबाची व इतरांची काळजी घ्यावी आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंगळवारी आहे.
कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड १९ हा आजार संपूर्ण जगात पसरला आहे. त्याने महामारीचे स्वरूप धारण केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या ७९-८० टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नसली तरी इतरांना संसर्ग होत असतो. त्यांच्यातही लक्षणे वाढू शकतात. शरीरक्रियेत गुंतागुंत होवून मृत्यू होवू शकतो. २०-२५ टक्के लोकांत सौम्य ते मध्यम लक्षणे व ५-१० टक्के लोकांमध्ये गंभीर लक्षणे आढळतात. २-३ टक्के रूग्णांचा मृत्यु होतो.
वयोवृद्ध व मधुमेह, हृदयरोग, किडनी निकामी असणे व इतर गंभीर आजार असल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या समूह संसर्गाची अवस्था असल्याने रूग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. उशिरा तपासणी व निदानामुळे गंभीर स्थिती होवून उपचाराला प्रतिसाद मिळत नाही.
इतर गंभीर आजार असले तरच मृत्यू संख्या वाढत आहे. आयुष मंत्रालयाचे मार्गदर्शक सुचनांनुसार आयुष काढा किंवा तत्सम औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोना किंवा इतर सांसर्गीक आजारांचा प्रतिबंध करण्यास किंवा तीव्रता टाळण्यास मदत होते. मात्र त्यामुळे अति आत्मविश्वासाने दक्षता न घेतल्यास संसर्ग होवू शकतो, याकडेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी लक्ष वेधले आहे.

अशा आहेत अफवा
कोरोना हा आजारच नाही, ते एक जागतिक षडयंत्र आहे. कोरोनाने कुणाचाच मृत्यू होत नाही. कोरोना पॉझिटिव्ह किंवा कोरोनाने मृत्यू झाल्यास डॉक्टरला दीडलाख रूपये मिळतात. पेशंटचे लिव्हर,किडनी काढून विकतात व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावतात. काढा किंवा तत्सम औषधे सातत्याने घेतल्यास कोरोना संसर्ग होवूच शकत नाही. पावसात भिजणे, आंबट खाल्ल्याने ताप व खोकला झाला म्हणून कोविड तपासणी करायची गरज नाही. स्वत:ला माहिती असलेल्या औषधांनीच ठीक होईल. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास लुट करतील. इतर रूग्णांपासून अधिक संसर्ग होवून रूग्णाकडे दुर्लक्ष करतील, अशाप्रकारच्या समाज माध्यमांमध्ये अफवा पसरविल्या जात आहेत.

अशी आहे वास्तविकता
कोरोना रूग्णासाठी दीडलाख रूपये मिळतात हीअफवा आहे. शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक औषध खरेदीसाठीच निधी उपलब्ध होतो. शासकीय किंवा खासगी डॉक्टरांना रूग्ण पॉझिटिव्ह दाखविल्याने किंवा रूग्णाचा मृत्यु झाल्यावर दीडलाख रूपये मिळत नाही. किडनीसारखे अवयव काढतात ही तर निंदणीय अफवा आहे. कोरोना बाधित रूग्णाचे शवविच्छेदन करण्यास मनाई आहे. मृत देहापासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी मृत देहाची विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केली जाते. त्यांचा अंत्यविधी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच केल्या जातो. कोरोना बाधित रूग्णाचे मृत देहाचे अंत्यविधी करण्याची जवाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे.

ताप, खोकला असला तरी करा चाचणी
इतर कारणांनीही ताप, खोकला होवू शकतो. मात्र, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोरोनाची शक्यता गृहीत धरून टेस्ट करावी. स्वत: निदान करून स्वत:च औषधोपचार घेणे अतिशय गंभीर आहे. यामुळे कोरोना संसर्ग असल्यास उशिर होवून योग्य उपचाराअभावी धोका होवू शकतो. रूग्णसंख्येच्या मानाने संसाधने व मनुष्यबळ अपुरे वाटत असले तरी प्रशासनाकडून तातडीने सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
 

Web Title: Misconceptions are spreading due to rumors about Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.