'तू माझ्यावर प्रेम कर, नाही तर मी.. ' म्हणत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; केंद्रप्रमुखाच्या हत्येनंतर प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:22 IST2025-10-13T14:20:17+5:302025-10-13T14:22:28+5:30
केंद्रप्रमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा : अल्पवयीन मुलीने दिली पोलिसात तक्रार

'Love me, or I will..' Minor girl raped; Details revealed after murder of centre chief
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाच्या हत्येचा आरोपी असलेल्या किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद याने मागील सहा महिन्यांपासून मूल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून घरी ठेवले. या काळात वारंवार अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायदा व अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
'तू माझ्यावर प्रेम केल नाहीस, तर मी माझ्या जिवाचं बरं-वाईट करीन' अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. पुढे त्याने हैदराबाद येथे तिला नेऊन ठेवले. नंतर तिने घरी परत येण्याची मागणी केली असता आरोपीने तिला घरी सोडले. त्यानंतरही तो तिला फोनवर "तुझ्याशी लग्न करायचे आहे, माझ्याबरोबर चल," असे सांगत सतत दबाव आणत होता. २२ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास आरोपीने मुलीला घरी येण्याच्या निमित्ताने घरातून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. २६ सप्टेंबर रोजी आरोपीने सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुनील गेडाम यांची हत्या केली व मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना घडली, ज्यामुळे मुलीमध्ये भीती निर्माण झाली. तिने आरोपींच्या कुटुंबाला तगादा लावून परत घरी सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आरोपीच्या मोठ्या भावाने तिला घरी सोडताच तिने तक्रार दाखल करून आपबिती सांगितली. पोलिसांनी पोस्को आणि अॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.
पोलिस पाटील अनभिज्ञ कसे ?
गावात घडणाऱ्या गंभीर घटनांची माहिती त्वरित पोलिसांना देणे पोलिसपाटलाचे काम आहे. पण, अल्पवयीन मुलींशी संबंधित अपहरणाची घटना गावात घडली असतानाही पोलिसपाटील अनभिज्ञ कसे, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेवरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.