लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले. यामुळे प्रत्येक नागरिकांवर निर्बंध आले असून अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवागी आहे. असे असतानाही काही व्यावसायिक स्वत:च्या स्वार्थासाठी स्वत:सह इतरांच्या जीवाशी खेळ करीत असून लपून-छपून व्यवसाय करीत आहे. दुकानाचे बाहेरून शटल बंद करून आतमध्ये व्यवसाय सुरु ठेवण्याचा प्रकार वाढला आहे. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाने आता या व्यावसायिकांवर कारवाई करणे सुरु केले आहे. मागील १५ दिवसांमध्ये प्रशासनाने विविध व्यावसायिकांकडून ४ लाख १० हजार ८०० रुपयांचा दंड वसुल केला आहे.कोरोनाचेे संसर्गामध्ये वाढ होऊ नये म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. असे असले तरी चंद्रपूर तालुक्यातील काही व्यावसायिक नियमांचे वेळोवेळी उल्लंघन करीत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने चंद्रपूर, घुग्घुस, पडोली परिसरातील व्यावसायिकांवर कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. ही कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, तहसीलदार निलेश गौंड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून या पथकामध्ये नायब तहसीलदार सचिन खंडाळे, नायब तहसीलदार राजू धांडे, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी रमेश आवारी, मंडळ अधिकारी नवरे, तलाठी पौर्णिमा बदखल, तलाठी विशाल कुरेवार आदींच्या पथकांनी केली. ही कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती पथकाने दिली.
अशी होणार कारवाईकोविड १९ नियमांचे जे पालन करणार नाही. त्यांच्यावर भारतीय दंड सहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसे आपत्तीव्यवस्थापन कायदा २००५चे कमल ५१ ते ६० नुसार शिक्षेसपात्र असून या कलमान्वये त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बहुतांश नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रतिबंधक नियम पाळत आहेत. परंतु काही जण अजूनही नियमांचे उल्लंघन करत असल्याने नाईलाजाने प्रशासनाला कारवाई करावी लागत आहे. नागरिकांनी, व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून आपल्यावरील कारवाई टाळावी. नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.- रोहन घुगेसहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर