पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST2021-07-16T04:20:07+5:302021-07-16T04:20:07+5:30

गशिअ चा प्रभार काढा, पुरोगामी शिक्षक समितीचे निवेदन फोटो गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार काढा : पुरोगामी शिक्षक समितीची मागणी चिमूर : ...

Confusion in the education department of the Panchayat Samiti | पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सावळागोंधळ

पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सावळागोंधळ

गशिअ चा प्रभार काढा, पुरोगामी शिक्षक समितीचे निवेदन

फोटो

गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार काढा : पुरोगामी शिक्षक समितीची मागणी

चिमूर : चिमूर पंचायत समितीअंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शिक्षकांचे उशिरा होणारे वेतन ही नित्याची बाब झालेली आहे. या त्रासाला कंटाळून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती तालुका शाखेने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चिमूर यांचा प्रभार काढावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून चिमूर पंचायत समितीत शिक्षण विभागाचा कारभार प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांच्या खांद्यावर आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून पदभार काढून दुसऱ्या प्रभारी विस्तार अधिकारी यांच्याकडे गट शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार दिला आहे. त्यांचाही अधिनस्त कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शिक्षण विभागात सावळा गोंधळ असून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. डिसीपीएस शिक्षकांच्या जमा रकमेचा घोळ, शिक्षकांची देयके गहाळ होणे, विभागातील लिपिकांवर कोणतेही नियंत्रण नसणे, सेवापुस्तके अद्ययावत नसणे, वेतनातील विविध कपातीचा घोळ, शिक्षकांचे वेतनाचे खाते परस्पर बदल करणे, सोसायटीचे डीडी वेळेत न मिळणे, दर महिन्याला रक्कम प्राप्त झाल्यानंतरही आठ-दहा दिवस उशिरा वेतन अदा होणे यासह अनेक समस्या प्रलंबित आहेत. विभाग प्रमुख या नात्याने शिक्षकांच्या समस्या सोडविणे ही गटशिक्षणाधिकारी यांची जबाबदारी आहे. त्यामुळे गट शिक्षणाधिकारी यांचा पदाचा प्रभार काढावा, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेने निवेदनातून केली आहे. भेटीदरम्यान संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी यापुढे वेतन नियमित वेळेत होणार व सेवापुस्तके अद्ययावतकरिता शिबिर लावण्याचे संघटनेला आश्वासन दिले. यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे नरेंद्र मुंगले, रवी वरखेडे, ताराचंद दडमल, सलीम तुरके, राजू चांदेकर, शकील कुरेशी, मुरलीधर नन्नावरे, गोवर्धन ढोक व गोविंद गोहणे आदी उपस्थित होते.

Web Title: Confusion in the education department of the Panchayat Samiti