युवकाच्या मृत्यूनंतर जमावाकडून तोडफोड

By Admin | Updated: October 18, 2015 00:59 IST2015-10-18T00:59:19+5:302015-10-18T00:59:19+5:30

तालुक्यातील परसोडी येथील गिरीधर गुलाब गोवरकर (२२) याला शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, शेतात विषारी सापाने दंश केला.

After the death of the youth, the mob broke down | युवकाच्या मृत्यूनंतर जमावाकडून तोडफोड

युवकाच्या मृत्यूनंतर जमावाकडून तोडफोड

पोलिसांचा लाठीचार्ज : डॉक्टरांचे दुर्लक्ष
ब्रह्पुरी : तालुक्यातील परसोडी येथील गिरीधर गुलाब गोवरकर (२२) याला शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, शेतात विषारी सापाने दंश केला. या घटनेनंतर त्याच्या एका मित्राने सायकलीने त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. परंतु त्याच्यावर योग्य उपचार न झाल्याने प्रकृती गंभीर होत गेली व त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना गावकऱ्यांना माहिती होताच, संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन दगडफेक व तोडफोड केली. या घटनेने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु जमाव शांत होत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागलाय यात रुग्णालयाचा सफाई कामगार विलास लक्ष्मण वैलधरे (३०) हा जखमी झाला. याप्रकरणी गावकऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालयात प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकाऱ्याच्या भरवशावर हे रुग्णालय सुरू असल्याने व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक डॉक्टरांचे खाजगी दवाखाने असल्याने ग्रामीण रुग्णालयात सेवेसाठी वेळ देत नाहीत. पोलिसांनी हारून शेख याला अकारण मारहाण केली. पंकज खरकाटे याला ताब्यात घेतले. परंतु हे दोन्ही युवक स्थानिक रहिवासी असून दगडफेकीशी व तोडफोडीशी याचा कुठलाही संबंध नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दवाखान्यात काय झाले हे बघण्यासाठी स्थानिक रहिवासी आले असता पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीचार्ज केल्याने पोलिसांप्रती येथे रोष आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: After the death of the youth, the mob broke down