सायंकाळी ५ वाजता शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. थोड्याच वेळात परिसरातील नाले, ओढे जलमय झाले होते. याच सुमारास बकरीसाठी चारा आणण्यास गेलेल्या येथील जिजामातानगरमधील मंगला गणेश शिंगणे, संगीता संतोष शिंगणे व वनिता अमोल पंधरे या तीन महिला घरी परतत असताना ओढ्याला पुर आला हाेता. या पुरात एकमेकींचा हात धरून, त्या सुरक्षित बाहेर पडण्याच्या प्रयत्न करीत होत्या. मात्र, त्याच वेळी त्यातील चाळीस वर्षीय मंगला गणेश शिंगणे ही महिला पुरात वाहून गेली. जवळपास कोणीच नसल्याने तिला शोधण्यास उशीर झाला. उर्वरित दोन महिला पुराच्या पाण्यातून वाचल्या असल्या, तरीही त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती ठाणेदार केशव वाघ यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वाघ यांच्यासह तहसीलदार सुनील सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. अंधार अधिक झाल्याने पुरात वाहून गेलेल्या महिलेचा शोध थांबविण्यात आला आहे.
ओढ्यात आलेल्या पुरात एक महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST