दुबार पेरण्या उलटण्याच्या वाटेवर
By Admin | Updated: July 22, 2014 00:15 IST2014-07-22T00:15:04+5:302014-07-22T00:15:04+5:30
अत्यल्प प्रमाणात पाऊस असून, साखरखेर्डा परिसरात तर अद्यापर्यंत कोठेही दमदार पावसाने हजेरी लावली नाही.

दुबार पेरण्या उलटण्याच्या वाटेवर
सिंदखेडराजा : तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस असून, साखरखेर्डा परिसरात तर अद्यापर्यंत कोठेही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. केवळ रिमझिम पावसाच्या भरवशावर ७५ टक्के शेतकर्यांनी पेरण्या केल्या; परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे आता दुबार पेरणीही उलटण्याच्या वाटेवरच दिसून येत आहे.
सिंदखेडराजा तालुका हा मराठवाड्याशी संलग्न आहे. जी गावे मराठवाडा सीमेवर आहेत, त्या भागात पेरणीपुरता पाऊस पडल्याने शेतकर्यांनी पेरण्या जून महिन्यातच केल्या; परंतु सारखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन या महसूल मंडळात पाऊसच पडला नाही. पावसाची सरासरी टक्केवारी पाहिली, तर ५ टक्केही पाऊस पडला नाही. शेंदुर्जन या मंडळात २ महिन्यात फक्त २५.00 मिमी पाऊस पडल्याने एकाही शेतकर्याने पेरणी केली नाही. तालुक्यातील मोहाडी, राताळी, शिंदी, सवडद, साखरखेर्डा, गुंजमाथा, सावंगीभगत, तांदूळवाडी, गोरेगाव, उमनगाव, लिंगा, सायाळा, बाळसमुद्र, पांग्रीकाटे, शेंदुर्जन, राजेगाव, हनवतखेड, हिवरागडलिंग, वाघाळा, शिवणी देशमुख, मलकापूर पांग्रा, आंबेवाडी, आगेफळ, झोटिंगा, देऊळगाव कोळ ही गावे पावसाविनाच आहे. दररोज ढगाळ वातावरण, २ मिनिटाचा रिमझिम पाऊस यामुळे शेतकरी पेरणीची लगबग करतो. शेतात पेरणीला सुरुवात करताच उन्हाचे चटके सुरू होतात. दररोजचा हा ऊन-सावलीचा खेळ पाहून शेतकरी पुरता धास्तावलेला आहे. महागडे सोयाबीन बियाणे, रासायनिक खते व पेरणीचा इतर खर्च याचा संपूर्ण हिशोब केला, तर एकरी १0 हजार रुपये खर्च शेतकर्यांना झालेला आहे. काहींची पहिली पेरणी वाया गेली असून, त्यांनी दुबार पेरणी केली आहे. किमान १ हजार हेक्टरवरील कपाशीवर उगवण्याअगोदरच वखर फिरविण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. कपाशी येत नाही म्हणून सोयाबीनशिवाय पर्याय नाही. परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे सोयाबीनही लांबणीवर पडत आहे. मागील वर्षी सर्वाधिक पाऊस तालुक्यातील शेंदुर्जन येथे बरसला होता. यावर्षी मात्र सर्वात कमी शेंदुर्जन येथेच झाला आहे. सतत गारपिटीमुळे अगोदर हरभरा, कांदा, गहू गेला. सोयाबीन आणि कापसाचे नगदी पीक हेही पाऊस नसल्यामुळे पेरता आले नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.