दहा हजार कृषीपंप विजेच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: August 14, 2015 23:41 IST2015-08-14T23:41:20+5:302015-08-14T23:41:20+5:30

महावितरणने जाहीर केली प्रलंबित कृषीपंपाची ज्येष्ठता यादी.

Waiting for ten thousand agricultural pumps | दहा हजार कृषीपंप विजेच्या प्रतीक्षेत

दहा हजार कृषीपंप विजेच्या प्रतीक्षेत

खामगाव : महावितरणच्या बुलडाणा मंडळ अंतर्गत ३१ मार्च २0१५ अखेर १0 हजार ८६0 कृषीपंपाला वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. या कृषीपंपांना टप्प्याटप्प्याने वीजजोडणी देण्यात येणार असून, सर्व उपविभागनिहाय नवीन कृषीपंपाच्या जोडणीकरिता मार्च २0१५ अखेर आवश्यक अनामत रकमेचा भरणा केलेल्या प्रलंबित अर्जदारांची ज्येष्ठता यादी महावितरणने जाहीर केली आहे. ही यादी महावितरणच्या मंडळ, उपविभाग व शाखा कार्यालयांसोबतच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील व पंचायत समितीमध्येसुद्धा लावण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना यादी पाहणे सोयीचे होणार आहे. अमरावती परिमंडळ अकोला कार्यालय अंतर्गत अकोला जिल्ह्यात ७६२१, वाशिम ७२३९, अमरावती १0६९२, बुलडाणा १0८६0, यवतमाळ ९९१३ अशी कृषीपंपाची वीजजोडणी प्रलंबित आहे. यापैकी मार्च २0१५ पर्यंत अनामत रकमेचा भरणा करणार्‍या कृषीपंपाची ज्येष्ठता यादी महावितरणने जाहीर केली आहे. या ज्येष्ठता यादीतील अनुक्रमणिकेनुसारच वीजपुरवठा जोडणी देण्यात येणार आहे. महावितरणच्या बुलडाणा मंडळाच्या उपविभागातील नवीन कृषी पंपाच्या जोडणीकरिता प्रलंबित कृषीपंप ग्राहकांनी सदर यादीत नाव, रक्कम भरल्याची तारीख व ज्येष्ठता यादीतील क्रमांक तपासून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Waiting for ten thousand agricultural pumps