रस्त्यावर उभी वाहने ठरताहेत वाहतुकीला अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST2021-02-06T05:04:42+5:302021-02-06T05:04:42+5:30

मोताळा : मोताळा-नांदुरा आणि मोताळा-मलकापूर रस्त्यांवर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतूककोंडी होत आहे, तसेच रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी ...

Vehicles parked on the road are becoming an obstacle to traffic | रस्त्यावर उभी वाहने ठरताहेत वाहतुकीला अडसर

रस्त्यावर उभी वाहने ठरताहेत वाहतुकीला अडसर

मोताळा : मोताळा-नांदुरा आणि मोताळा-मलकापूर रस्त्यांवर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतूककोंडी होत आहे, तसेच रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मोताळा येथे खरेदीसाठी येणारे नागरिक वाटेल तेथे वाहने उभी करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पोलिसांनी बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे.

मुख्य रस्त्यांवर छोट्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. काहींनी तर चक्क रस्त्यावरच दुकाने थाटल्याचे चित्र मोताळा येथे पाहायला मिळत आहे. तर खरेदीसाठी येणारे नागरिक या दुकानांमध्ये खरेदी करताना आपली वाहने चक्क रस्त्यावरच उभी करत आहेत. दुसरीकडे बेशिस्त वाहतुकीलाही उधाण आले आहे. मिळेल त्या जागेवर वाहने उभी करणे, वाटेल तशी वाहने चालवली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघातही होत आहेत. संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. नगर पंचायतीनेही अनेक दिवसांपासून रस्त्यावरील अतिक्रमण हटवलेले नाही, त्यामुळे मोताळा येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आता नगर पंचायतीनेच पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

----

चौकट...

वाहतूककोंडी झाली नित्याचीच बाब

अपुऱ्या जागेमुळे अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. काही दुकानदार तर अर्ध्या रस्त्याचा बिनदिक्कतपणे वापर करतात, तर विविध ठिकाणी वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

---

Web Title: Vehicles parked on the road are becoming an obstacle to traffic