टिनपत्रे अंगावर पडल्याने दोन विद्यार्थी जखमी

By Admin | Updated: January 1, 2017 01:36 IST2017-01-01T01:36:00+5:302017-01-01T01:36:00+5:30

संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावातील घटना; शिकस्त इमारतीचा होत होता वापर.

Two students injured due to wearing tinting | टिनपत्रे अंगावर पडल्याने दोन विद्यार्थी जखमी

टिनपत्रे अंगावर पडल्याने दोन विद्यार्थी जखमी

संग्रामपूर, दि. ३१- तालुक्यातील बोडखा गावात जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळा असून, शिकस्त झालेल्या इमारतीच्या व्हरांड्यात राष्ट्रगीत सुरू असताना शिकस्त सिमेंटचे वजनदार टिनपत्रे दोन विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्यामुळे एका विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर मार लागला. तर दुसर्‍या विद्यार्थिनीच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली.
या शाळेसाठी दोन वर्षांपूर्वी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन इमारतीमध्येच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या इमारतीला भव्य असा व्हरांडा व समोर पटांगणसुद्धा आहे; मात्र असे असतानाही मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत दररोज सकाळी शिकस्त झालेल्या व जुन्या इमारतीच्या व्हरांड्यातच राष्ट्रगीत घेत आहेत. मुख्याध्यापक गोगटे यांच्या निष्काळजीपणामुळे जुन्या व शिकस्त झालेल्या इमारतीच्या व्हरांड्यात २८ डिसेंबर रोजी राष्ट्रगीत घेण्यात आले. दरम्यान, राष्ट्रगीत सुरू असताना या जीर्ण झालेल्या इमारतीच्या व्हरांड्यातील छताची सिमेंटचे वजनदार टिनपत्रे इयत्ता पहिलीतील विद्यार्थी नमन श्रीकृष्ण कीर्तने याच्या पायावर पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. तर प्रणाली गौतम इंगळे या इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनीच्या पाठीवर टिनपत्रा पडल्यामुळे तिच्या पाठीला मोठी जखम झाली; मात्र मुख्याध्यापक रामदास गोगटे यांनी या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कुठलीही कल्पना न देता दुपारी ३ वाजेपर्यंत कुठलेही उपचार या विद्यार्थ्यांवर न करता या विद्यार्थ्यांना शाळेमध्येच बसवून ठेवले. या घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना पालकांनाच उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागले. या घटनेबाबतची कुठलीही माहिती न दिल्यामुळे पालकांनी ३१ डिसेंबर रोजी सकाळी मुख्याध्यापक रामदास गोगटे यांची कानउघाडणी केली. विशेष म्हणजे पालकांनी मुख्याध्यापक गोगटे यांना जीर्ण इमारतीच्या व्हरांड्यात राष्ट्रगीत घेऊ नका, याबाबत बर्‍याच वेळा सांगितले आहे; मात्र मुख्याध्यापक गोगटे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी पालक वर्गाकडून होत आहे.

Web Title: Two students injured due to wearing tinting