आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्तच मिळेना; जिल्हा परिषद प्रशासन उदासीन
By संदीप वानखेडे | Updated: September 12, 2022 18:09 IST2022-09-12T18:08:35+5:302022-09-12T18:09:12+5:30
बुलढाणा जिल्ह्यात आदर्श शिक्षण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अद्याप कागदावरच आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्तच मिळेना; जिल्हा परिषद प्रशासन उदासीन
बुलढाणा : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते शिक्षकांसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या या पुरस्कारांचे जिल्ह्यात तीन वर्षांपासून वितरणच झाले नसल्याचे चित्र आहे. यंदाही या पुरस्कारांची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही जिल्हा परिषद प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दरवर्षी हे पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वितरीत करणे अपेक्षित असते मात्र २०१८ पासून या पुरस्कारांची केवळ घोषणाच झाली आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमांचे आयोजनच करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षे कोरोनामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. मात्र यंदा कोरोना नियंत्रणात असतानाही पुरस्कार निवडीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली नसल्याचे चित्र आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.