सुपर पॉवर प्रकरणात जप्तीची कारवाई

By Admin | Updated: December 22, 2014 00:50 IST2014-12-22T00:50:40+5:302014-12-22T00:50:40+5:30

लोणार येथील कार्यालयातील ५ संगणक संचासह फर्निचर साहित्य जप्त.

Recovery of seizure in super power case | सुपर पॉवर प्रकरणात जप्तीची कारवाई

सुपर पॉवर प्रकरणात जप्तीची कारवाई

लोणार : बहुचर्चित सुपर पॉवर चिट फंड घोटाळ्यातील अमरावती विभागीय अधिकारी कैलास महाजन यास चार दिवसांपूर्वी रिसोड येथून औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, २१ डिसेंबर रोजी महाजन यांच्या येथील विभागीय कार्यालयातील ५ संगणक संचासह फर्निचर साहित्य जप्त केल्याची कारवाई औरंगाबाद पोलिसांनी केली. मुदत ठेवीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार, व्यापारी यांच्याकडून लाखो रुपये जमा करून सुपर पॉवर इन्व्हेंस्टमेंट कंपनीत गुंतविलेल्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांकडून सुपर पॉवर कंपनीच्या एजटांविरोधात औरंगाबाद पोलिसात फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारीवरून औरंगाबाद पोलिसांनी महिनाभराआधी शहरातील दत्ता मापारी यांना अटक केली. तर चार दिवसांपूर्वी वाशिम जिल्हय़ातील रिसोड येथून सुपर पॉवर कंपनीचे अमरावती विभागीय अधिकारी कैलास महाजन यांना अटक केली. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी चौकशीसाठी महाजन यांना न्यायालयात हजर करून २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मागितली. दरम्यान, रविवारला औरंगाबाद पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक महाजन यांच्या लोणार येथील कार्यालयाच्या चौकशीसाठी आले. यादरम्यान पोलिसांनी कार्यालयातील ५ संगणक संचासह फर्निचर साहित्य ताब्यात घेतले. यावेळी ठाणेदार सावंत यांनी संगणकातील डाटा चौकशीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. सुपर पॉवर कंपनीचे विभागीय अधिकारी महाजन यांना अटक झाल्याने शहरातील इतर एजंटही कारवाईच्या भितीने फरार झाले आहेत. सुपर पॉवर कंपनीत रक्कम गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी यावेळी औरंगाबाद पोलिसांनी एजंटांनी वाटप केलेल्या धनादेशासह तक्रारी लेखी स्वरूपात दिल्या. तक्रारी देण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती.

Web Title: Recovery of seizure in super power case