मलकापूरचे मुख्याधिकारी निलंबित

By Admin | Updated: October 2, 2015 02:15 IST2015-10-02T02:15:50+5:302015-10-02T02:15:50+5:30

रिसोड नगरपालिकेतील गैरकारभार भोवला.

Malkapur's Chief Officer suspended | मलकापूरचे मुख्याधिकारी निलंबित

मलकापूरचे मुख्याधिकारी निलंबित

मलकापूर (जि. बुलडाणा) : येथे नव्याने रुजू झालेल्या पालिका मुख्याधिकारी दीपक इंगोले यांना रिसोड पालिकेतील गैरकारभार प्रकरणी राज्य शासनाने निलंबीत केले आहे. ३0 सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, निलंबन काळात जिल्हाधिकारी कार्यालय हे त्यांचे मुख्यालय राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. सोबतच या कालावधीत त्यांना खासगी नोकरीही करता येणार नसल्याचे यासंदर्भातील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. रिसोडसह वाशिम येथीलही त्यांची कारकिर्द वादग्रस्त होती. रिसोडच्या माजी नगराध्यक्षा प्रतीभा झडपे, मोहनराव देशमुख, यशवंत देशमुख यांच्यासह अन्य नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. रिसोड पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत आयोगाने घालून दिलेल्या बंधनापेक्षा अधिक रकमेचा त्यांनी खर्च केला होता. वाशिमचे प्रभारी मुख्याधिकारी असताना त्यांनी स्वत:च्या भावाला लाभ व्हावा, या दृष्टीने त्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा वापर केल्याबाबतच्या तक्रारी झाल्या होत्या. त्याबाबत वाशिम जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र नागरी सेवा व अपिल नियम १९७९ नुसार त्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे पत्र क्र.रानिआ/नप-२0१३/ प्रक्र१२/का-६ दि.१ एप्रिल २0१५ तील आरोप व तक्रारींचे प्रकरण शासनाकडे चौकशीवर ठेवण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम (१) (अ) व (ब) च्या तरतुदीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशाने दिपक इंगोले यांना ३0 सप्टेंबर रोजी निलंबीत करण्यात आले आहे. राज्याचे अवर सचिव जी. बी. शिंदे यांच्या स्वाक्षरीने हा निर्णय झाला आहे.

Web Title: Malkapur's Chief Officer suspended