प्रवासात चुकाल तर जीवनाला मुकाल

By Admin | Updated: May 22, 2014 23:39 IST2014-05-22T23:07:13+5:302014-05-22T23:39:17+5:30

खबरदारीची गरज : थेट मृत्यूलाच निमंत्रण

If you miss the journey, then life will be lost | प्रवासात चुकाल तर जीवनाला मुकाल

प्रवासात चुकाल तर जीवनाला मुकाल

शेगाव: रेल्वे कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध विक्रेते किंवा अनोळखी इसमांकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे दोन दिवस शुद्धीवरही येत नाहीत. हा निष्काळजीपणा अनेक प्रवाशांच्या जीवितावरही बेततो. तर अनेकदा उशिरा रेल्वेस्थानकावर पोहोचलेले प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करून थेट मृत्यूलाच आव्हान देतात. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलीच सावधानी बाळगताना दिसत नाहीत. याबाबत जागृती करूनही प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. शेगाव रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ ते ३0 प्रवासी गाड्या ये-जा करतात. या गाड्यांच्या प्रवेशव्दारावर उभे राहून प्रवास करण्याची फॅशन सध्या जोर धरत आहे. यामध्ये अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. रेल्वे आणि त्यातील प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे तो विभाग हे सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. तीन महिन्यांपूर्वी बाळापूर येथील एक महिला सुरु झालेल्या रेल्वेमध्ये चढताना रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधात आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. आज शेगावचे रेल्वेस्थानक अपघाताला आमंत्रण देत आहे. असाच प्रकार मलकापूर, नांदूरा रेल्वे स्थानकावरही सर्रास दिसून येतो. नांदुर्‍यामध्ये तर रूळ ओलांडणार्‍यांची संख्या शेगावपेक्षाही मोठी असली तरी कारवाई शून्य आहे. रेल्वेचे सर्वाधिक अपघात रुळ ओलांडताना तसेच फलाट आणि गाडीचा फुटबोर्ड यात असलेल्या पोकळीमधून पडून होतात. या अपघातांमध्ये वाढ होत असूनही रेल्वे मात्र त्यावर ठोस कार्यवाही करण्यात कमी पडते आहे. हे अपघात झाल्यानंतर पहिल्या एक तासात म्हणजेच गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्ताला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्याचा जीव बचावण्याची दाट शक्यता असते; मात्र रेल्वे यंत्रणेकडे याच तत्परतेचा अभाव असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

Web Title: If you miss the journey, then life will be lost