ऐतिहासिक मंदिरांचे होणार संवर्धन!

By Admin | Updated: March 18, 2017 01:03 IST2017-03-18T01:03:49+5:302017-03-18T01:03:49+5:30

लोणार विकास आराखड्यात समावेश; ९३ कोटी ४६ लाख रुपयांची होणार विकास कामे.

Historical temples to be promoted! | ऐतिहासिक मंदिरांचे होणार संवर्धन!

ऐतिहासिक मंदिरांचे होणार संवर्धन!

किशोर मापारी
लोणार, दि. १७- लोणार विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून, या आराखड्यांतर्गत आता भग्नावस्थेत असलेल्या ऐतिहासिक व प्राचीन मंदिरांचेही संवर्धन करण्यात येणार आहे.
ह्यलोणार सरोवर संवर्धन आराखडा ठरतोय मृगजळह्ण या मथळ्याखाली ह्यलोकमतह्णने २२ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये येथील प्राचीन मंदिरांची होत असलेली दुरवस्था, वैज्ञानिक, नैसर्गिक व पुरातन वास्तू असलेला वारसा नष्ट होत असल्याचे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यांचे जतन करण्याची मागणी केली. लोणार सरोवर पर्यटन महोत्सव कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कृषिमंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव व आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी लोकमत वृत्त मालिकेची दखल घेत येथील विकास कामासाठी आगामी होणार्‍या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मागणी करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते, तसेच लोणार विकास आराखड्यात प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचा मुद्दा जोडण्यात आला. १५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत लोणार पर्यटन विकास आराखडा ९३ कोटी ४६ लाख रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे.
जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू असून, त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लोणार सरोवर परिसरातील दुर्मीळ व मौल्यवान असलेल्या वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, खडकाचे विनापरवानगी खोदकाम करून मानवी हस्तक्षेप वाढत चाललेला आहे.
यामुळे लोणार सरोवराचा विकास तर दूरच; पण असलेला ठेवाही नष्ट होत चाललेला आहे. दिशाफलकाअभावी लोणारला येणार्‍या पर्यटकाची अनेकवेळा दिशाभूल झालेली असल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कसेबसे येथे पोहोचल्यावर सरोवर पाहून थक्क झालेल्या पर्यटकांचा मात्र असुविधेमुळे जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवराबद्दल भ्रमनिरास होतो.
कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधाही शहरात मिळत नसल्यामुळे देश व विदेशातील पर्यटक येथे न थांबता औरंगाबाद येथे जाणे पसंत करत असल्यामुळे लोणार सरोवर पर्यटन स्थळाची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Historical temples to be promoted!