जड वाहतुकीने नागरिक त्रस्त
By Admin | Updated: July 22, 2014 00:13 IST2014-07-22T00:13:51+5:302014-07-22T00:13:51+5:30
शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास धोका

जड वाहतुकीने नागरिक त्रस्त
देऊळगावराजा : पुणे- नागपूर राष्ट्रीय महामार्ग देऊळगावराजा शहराच्या मध्यवस्तीतून जातो. या मार्गावरून रात्रंदिवस भरधाव वाहतुकीसह जड वहाने धावत असतात. जड वहातुकीमुळे नागरिक व शाळाकरी मुले त्रस्त झाले असून, अपघाताची भीती व्यक्त होत आहे. देऊळगावराजा शहर हे तालुक्याचे मोठे ठिकाण आहे. या ठिकाणी दैनंदिन कामासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. शहराच्या मध्यवस्तीतून गेलेल्या मार्गावर नागरिकांची ये-जा असते. याच मार्गावरून दिवसभर जड वाहनांची रेलचेल सुरू असते. येथील बसस्थानक चौक, संतोष चौक नेहमी गजबलेला असतो, बसस्थानकातून दिवसभरात चारशे ते पाचशे बसेस जातात. तसेच बसस्थानकाच्या परिसरात व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे आणि त्यातच अवैध प्रवासी वाहने मनमानी पद्धतीने उभी केली जातात. त्यामुळे अनेकदा वहातुकीची कोंडी होते. एखादा मोठा कंटनेर आला, तर अर्धा-अर्धा तास वाहतूक खोळंबते. खोळंबलेल्या वाहतुकीतून अनेक छोटी वाहने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. त्यातून वाद वाढण्याचे प्रकार घडतात; मात्र या ठिकाणी वाहतूक पोलिस दिसत नाहीत. वाहतूक पोलिसांची ड्युटी असली तरी ते आपली ड्युटी शहराबाहेर करताना दिसत आहे. पुणे- नागपूर राज्य महामार्गासाठी शहराबहेरून बायपास काढलेला आहे; पण त्याचे काम अर्धवट पडलेले असून, त्वरित बायपासचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. अनेक जड वाहने रात्रीच्या वेळी हॉटेल आणि धब्यासमोर उभे असतात. त्याचे पार्किंग लाईटही लावले नसतात. भरधाव वाहन उभ्या असलेल्या वाहनावर आदळण्याची कायम भीती असते. अनेक अपघात यामुळे झाल्याचे दिसून आले आहे.