फळांचा राजा खातोय बाजारपेठेत भाव!

By Admin | Updated: April 25, 2017 00:15 IST2017-04-25T00:15:39+5:302017-04-25T00:15:39+5:30

खामगाव- फळांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक उत्साहात खरेदी करताना दिसून येतात. प्रामुख्याने फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा भाव खाताना दिसून येतो.

Fruit King prices in the market! | फळांचा राजा खातोय बाजारपेठेत भाव!

फळांचा राजा खातोय बाजारपेठेत भाव!

बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली!

खामगाव : बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली असून या रसाळ फळांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक उत्साहात खरेदी करताना दिसून येतात. प्रामुख्याने फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा भाव खाताना दिसून येतो.
निसर्गाने प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे निर्माण केलेली आहेत. या मौसमी फळांचे सेवन करणे मनुष्याच्या आरोग्यासाठी हितकारक असते. शरीराला उत्तम पोषण देतानाच फळे रोगहारक म्हणून सुध्दा काम करतात.
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची गरज लक्षात घेता निसर्ग सुध्दा रसाळ फळांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करित असल्याचे दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, द्राक्ष, मोसंबी, संत्री, अननस, ओले नारळ, आंबा आदी पाणीदार फळांची रेलचेल बाजारात दिसते.
सध्या बाजारात हीच रसदार फळे दाखल झालेली आहेत. यामध्ये सर्वांचा आवडता, फळांचा राजा आंबा ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळविताना दिसून येतो. वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांचे वेगवेगळे भाव असून दररोज भावात किरकोळ चढ-उतार होत आहेत.
बच्चे कंपनी सुध्दा सर्वाधिक आंब्यालाच पसंती देते. तसेच पाहुण्यांकरिता पाहुणचार करताना सुध्दा आमरस हा जेवणातील अविभाज्य घटक ठरत असल्याने आंब्यांनाच जास्त मागणी आहे.

आंब्याचा रस ठरतोय महागड्या भाज्यांना पर्याय
उन्हाळ्याच्या दिवसात भाज्यांची आवक कमी होवून भाव वाढत असतात. अशावेळी आंब्याचा रस भाजीला सशक्त पर्याय म्हणून समोर येतो. त्यामुळे गृहिणींचा भाजीचा प्रश्न सोडविण्यासाठी आंबा हातभार लावताना दिसून येतो.शेवळ्या, भात किंवा पोळीसोबत आंब्याचा रस असला की अनेकांचा जेवणाचा बेत फत्ते होतो.

रसांनाही ग्राहकांची पसंती
वेगवेगळ्या फळांचे रस, ऊसाचा रस, निंबूपाणी, नारळपाणी यांनाही ग्राहकांची पसंती मिळताना दिसून येते. विशेषता ऊसाचा रस व आंब्याचा तयार रस देणारी दुकाने अलिकडे गर्दी खेचताना दिसत आहेत. मठ्ठा, लस्सी या दुग्धजन्य पदार्थांना तुलनेत कमी मागणी आहे. चहाची दुकाने तर ओस पडल्यासारखी दिसत आहेत.

यावर्षी आंबे लवकर बाजारात आले. तसेच एकाचवेळी अनेक फळे बाजारात आले आहेत. पण मालाला पाहिजे तसा उठाव नाही. गिऱ्हाईकी अपेक्षेपक्षा कमी आहे. चलन तुटवड्याचाही हा परिणाम असू शकतो.
- गुड्डू अलीम, फळविक्रेता

Web Title: Fruit King prices in the market!