खामगावात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

By Admin | Updated: April 22, 2017 00:58 IST2017-04-22T00:58:40+5:302017-04-22T00:58:40+5:30

सामान्य रुग्णालयाच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

The first victim of Swine Flu in Khamagawa is Swine Flu | खामगावात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

खामगावात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

खामगाव (जि. बुलडाणा): शहरातील हिरानगर भागातील २५ वर्षीय विवाहितेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. स्वाइन फ्लूचा हा शहरातील पहिला बळी गेला असून याबाबत सामान्य रुग्णालयाच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे.
गत काही दिवसांपासून स्वाइन फ्लूची लागण झालेले रुग्ण अकोला येथील सवरेपचार रुग्णालय तथा खासगी रुग्णालयात दाखल झालेले असून, त्यातील पाच रुग्णांचा मृत्यूही झाला. यात हिरानगर भागातील २५ वर्षीय विवाहितेचा समावेश आहे. सदर महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती खामगाव येथील सामान्य रुग्णालयास ३ दिवसांपूर्वी मिळाली. त्यावरुन सामान्य रुग्णालयाच्या पथकाने हिरानगर भागात जावून सर्वेक्षण केले मात्र स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याची गरज नाही असे सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड
स्वाइन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक सामान्य रुग्णालयात शनिवार २२ एप्रिलपासून आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्यात येत आहे. सदर वॉर्डची तयारी पूर्ण झाली असून यामध्ये व्हेंटीलेटर, नेब्युलायझर, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. तसेच टॅमी फ्लू गोळ्यांसह पुरेसा औषधसाठा उपलब्ध असून आणखी औषधसाठी मागविण्यात आलेला आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.

स्वाइन फ्लूबाबत डॉक्टरांची कार्यशाळा लवकरच
स्वाईन फ्लूबाबत डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यासाठी शहरातील सर्व डॉक्टरांची कार्यशाळा आरोग्य विभागाच्यावतीने लवकरच घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पॅथीच्या डॉक्टरांना निमंत्रित करुन स्वाईन फ्लूबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

स्वाइन फ्लू या रोगावर उपचार उपलब्ध असून रोग्यांनी कोणतीही लक्षणे जाणवल्यास हलगर्जीपणा न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार मिळाले तर हा रोग निश्‍चितपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये.
-डॉ. निलेश टापरे
निवासी वैद्यकीय अधिकारी

Web Title: The first victim of Swine Flu in Khamagawa is Swine Flu