शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाचा सत्कार

By Admin | Updated: April 24, 2017 00:15 IST2017-04-24T00:15:26+5:302017-04-24T00:15:26+5:30

चिंचपूर येथील विद्यार्थिनीचा आग्रह : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक

Felicitated the family building the toilets | शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाचा सत्कार

शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाचा सत्कार

मोताळा: तालुक्यातील चिंचपूर येथील मराठी प्राथमिक शाळेच्या मुलीच्या आग्रहास्तव तिच्या कुटुंबाने कर्ज काढून शौचालय बांधले. शौचालय बांधून समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या या कुटुंबातील सदस्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम शेलापूर केंद्रातील १२ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. लोकशाहीचा जबाबदार नागरीक घडविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्ये उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जात आहेत. माझे कुटुंब, माझ्या जबाबदाऱ्या, स्वच्छतेची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरी शौचालय असावेच, असे महत्त्व विद्यार्थ्यांना वेळोवळी सांगितले जाते.
यातूनच प्रेरणा घेऊन म.प्रा. शाळा चिंचपूर या शाळेतील इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली नूतन विष्णू धोरण हिने आपल्या घरी शौचालय बांधण्याचा हट्ट धरला. आई-वडिलांचा शेतमजुरी व्यवसाय. गरिबीमुळे ते शक्य नव्हते. तरीही मुलीच्या हट्टासाठी आईने स्वत:चे मनी मंगळसूत्र, आजीच्या पाटल्या इ. दागीने बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतले व त्यातून शौचालय बांधले व त्याचा वापर करीत आहेत. मुलीच्या हट्टासाठी कर्ज काढून शौचालय बांधणारे हे कुटुंब समाजासाठी आदर्श ठरत असून, अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून म.प्रा. शाळा चिंचपूर येथे त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंता मापारी हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये गटशिक्षणाधिकारी पी.एस. मोरे, केंद्रप्रमुख डी.एस. प्राणकर हे होते. याप्रसंगी नूतन हीस स्कूलबॅग देऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले. केंद्रप्रमुख यांनी गणवेशासाठी आर्थिक मदत दिली. तर मुख्याधापिका निर्मला पाटील यांनी धोरण कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पांडे, अंगणवाडी सेविका यांनी मूल्यवर्धनामुळे विद्यार्थ्यात दिसत असलेले बदल याबाबत माहिती दिली. संचालन अमर मापारी यांनी केले. कार्यक्रमास प्रमोद मापारी, माजी अध्यक्ष, शिक्षकवृंद, बाहेकर, मु.अ. शेलापूर, गावकरी, प्रतिष्ठित नागरिक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Felicitated the family building the toilets