बायोमेट्रिक यंत्रणेला निधीची अडचण

By Admin | Updated: January 20, 2015 00:48 IST2015-01-20T00:48:22+5:302015-01-20T00:48:22+5:30

स्वस्त धान्य दुकानाच्या योजनेसाठी २ कोटींची गरज : बुलडाणा जिल्हाधिका-यांकडून मिळणार ७५ लाखांचा निधी.

The difficulty of funding the biometric system | बायोमेट्रिक यंत्रणेला निधीची अडचण

बायोमेट्रिक यंत्रणेला निधीची अडचण

नीलेश शहाकार /बुलडाणा: 
शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य वाटप करताना दुकानदारांकडून मोठय़ा प्रमाणात होणारा काळा बाजार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात आता बायोमेट्रिक यंत्रणा लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा निधी मंजूर न झाल्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्र बसविण्यास निधीची अडचण निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना तहसील कार्यालयाकडून वेळेवर धान्य पुरवठा करण्यात येतो. रेशन दुकानदार महिन्याला आपला कोटा पूर्ण करून घेतात; मात्र काही दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देण्याऐवजी त्याची विल्हेवाट काळ्या बाजारात लावून स्वत:चा स्वार्थ साधतात. त्यामुळे एपीएल, बीपीएलधारकांसह अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थीही धान्यापासून वंचित राहत आहेत.
या संदर्भात महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचा विचार करून जुलै २0१४ मध्ये स्वस्त धान्य दुकानांच्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. स्वस्त धान्य दुकानात लावण्यात येणार्‍या या प्रणालीवर ह्यअंगठा लावा आणि धान्य मिळवाह्ण असा नावीन्यपूर्ण उपक्रम जळगाव (खान्देश), जालना जिल्ह्यात सुरू आहे. हा उपक्रम यानंतर बुलडाणा जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे. या योजनेतून शिधापत्रिकाधारक कुटुंबप्रमुख, विशेषत: महिला आपल्या परिसरातील संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन तेथील बायोमेट्रिक यंत्रावर आपला अंगठा लावून नोंद करतील. त्यानंतर यापुढे बायोमेट्रिक यंत्रावर अंगठा दाखवल्यानंतरच संबंधित लाभार्थ्याला धान्य मिळेल. या प्रणालीमुळे काळ्या बाजारावर अंकुश बसणार आहे.

Web Title: The difficulty of funding the biometric system