संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसची पदयात्रा

By Admin | Updated: August 14, 2015 23:36 IST2015-08-14T23:36:57+5:302015-08-14T23:36:57+5:30

खामगाव ते पिंपळगावराजा १८ किलोमीटर पदयात्रेत साधला जनसंवाद.

Congress's hike to complete debt waiver | संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसची पदयात्रा

संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसची पदयात्रा

खामगाव : माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी १८ कि.मी. खामगाव ते पिंपळगावराजा काँग्रेस संदेश पदयात्रेचा शुभारंभ श्री स्वामी सर्मथ आध्यात्मिक केंद्र येथून करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, बुलडाण्याचे आ.हर्षवर्धन सपकाळ, खामगावचे माजी आ. दिलीपकुमार सानंदा, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सहप्रभारी ऋत्विक जोशी, बुलडाणा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष डॉ.तबस्सुम हुसेन, युवक काँग्रेसचे बुलडाणा जिल्हा निरीक्षक सागर देशमुख, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा, माजी जि.प. अध्यक्ष वर्षा वनारे आदी सहभागी झाले होते.
यात्रेच्या प्रारंभी बोलताना माजी आ.सानंदा म्हणाले की, नरेंद्र, देवेंद्रचे भाजप सरकार आल्यानंतर शेतकर्‍यांच्या आत्महत्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकर्‍यांना जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस लढा देणार, अशी ग्वाही दिली. शेतकरी नैसर्गिक संकटांनी हतबल झालेला असताना या संवेदनाहिन सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. हे भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी ऋत्विक जोशी यांनी केली. जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार हे अपयशी सरकार ठरले आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दुष्काळाचे सावट असताना शेतकर्‍यांना मदत करण्याची भूमिका शासन घेत नसल्याबाबत त्यांनी आरोप केला, तर आ.सपकाळ यांनी कुठे गेले अच्छे दिन, असा प्रश्न उपस्थित करून शेतकर्‍यांसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने आंदोलनाची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.

Web Title: Congress's hike to complete debt waiver