Karnatak Election 2018 - Why does Yeddyurappa's war just not against Congress and Janata Dal but BJP also? | Karnatak Election 2018 - येडियुरप्पांना काँग्रेस, जनता दलाप्रमाणेच भाजपाशीही का लढावे लागत आहे?
Karnatak Election 2018 - येडियुरप्पांना काँग्रेस, जनता दलाप्रमाणेच भाजपाशीही का लढावे लागत आहे?

बुकानकेरे सिद्दालिंगप्पा येडियुरप्पा...बीएसवाय...एक नाव ज्याला वगळून सध्या तरी कर्नाटकचे राजकारण होऊच शकत नाही. किंवा तसे करु पाहणाऱ्याला त्या नावाचा पाऊणशे वयाचा पण पंचविशीच्या आक्रमकतेचा नेता यशस्वीच होऊ देणार नाही. मग ते अगदी ‘हम करे सो कायदा’वृत्तीने चालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो वा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा. दोघांनाही बी.एस.येडियुरप्पा या कर्नाटकातील राजकीय नेत्याची शक्ती माहिती असल्यानेच त्यांनी स्वत:चेच नियम बदलले अवघ्या देशात ते फक्त कर्नाटकात. त्यातही सुरुवातीला फक्त आणि फक्त येडियुरप्पांसाठीच !

येडियुरप्पांचे नाव तसे वादग्रस्तच. स्वत:चे राजकारण साधताना फार काही ते कोणाची सोय पाहत नाहीत. आपली भूमिका पुढे रेटून पुढे जात राहणे त्यांना आवडते. तसेच जर त्यांची कोंडी केली जात आहे असे वाटले किंवा ते अडचणीत येऊ लागलेत तर ते कसे वागतील त्याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत आणि वोकलिंगा या दोन जाती खूप प्रभावी. लिंगायत समाजाकडे २२४ पैकी १०० मतदारसंघाचे निकाल बदलण्याची शक्ती. येडियुरप्पा लिंगायत समाजाचे. हा समाज खरा काँग्रेसचा हक्काचा मतदार. पण १९८०च्या दरम्यान काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी त्यांना जी वागणूक दिली त्यामुळे ते दुखावले गेले. आणि त्यांचा लिंगायत समाज काँग्रेसपासून दुरावला. नेमक्या त्याच काळात राजकीय क्षितिजावर चमकू लागलेल्या येडियुरप्पांनी त्याचा फायदा घेतला. ते लिंगायतांचे आपले नेते झाले. संपूर्ण समाज भाजपाशी बांधला गेला. मात्र मधल्या काळात घोटाळ्यांचे आरोप झालेल्या येडियुरप्पांना भाजपाने पायउतार करताच ते जसे पक्षापासून दुरावले तसाच लिंगायत समाजही. येडियुरप्पांच्या कर्नाटक जनता पक्षाचा पराभव झालाच पण भाजपालाही सत्ता गमवावी लागली. काँग्रेस सत्तेवर आली. २०१४च्या मोदीलाटेआधी ते पुन्हा भाजपात आले. ते परतले, स्वत: खासदार झाले आणि यशही भाजपाकडे परतले. 

येडियुरप्पांचा जन्म २७ फेब्रुवारी १९४३चा. मंड्या जिल्ह्यातील  के.आर.पेट तालुक्यातील बुकनकेरे गावी ते जन्माला आले. संत सिद्दालिंगेश्वरा यांनी तुमकुरमध्ये येडियूर मंदिराची स्थापना केली होती. त्या मंदिराच्या नावातून त्यांचे नाव ठेवण्यात आले. कोठेतरी श्रद्धाळू लिंगायत समाजाशी जन्मापासूनच नाते जुळण्यास सुरुवात झाली असावी ती अशी. घरची परिस्थिती तशी बऱ्यापैकी. मंड्या महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर १९६५मध्ये समाज कल्याण खात्यात प्रथम श्रेणी कारकून म्हणून ते रुजू झाले. पण सरकारी नोकरीत मन काही रमले नसावे. ती सोडून ते विरभद्र शास्त्रींच्या शिकारीपुरा येथील शंकर राइस मिलमध्ये कारकून झाले. १९६७मध्ये मिलच्या मालकाची कन्या मिथ्रादेवीशी त्यांचे लग्न झाले. आधीपासूनच याच परिसरात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही जाळे विणले. १९७०मध्ये ते संघाचे नगर कार्यवाह झाले. दरम्यान जनसंघाच्या माध्यमातून त्यांचा याच परिसरात राजकारण प्रवेश झाला. पुढे भाजपापर्यंतचा प्रवासही. तसाच नगरसेवक पदापासून आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, विरोधीपक्ष नेते, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदापर्यंतचं सत्तेच राजकारणही रंगले. 

शिकारीपुराने येडियुरप्पांना चांगलीच साथ दिली. सातत्याने ते तेथून  आमदार म्हणून निवडून आले. अगदी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बंगारप्पा हे काँग्रेस, जनता दलाच्या संयुक्त पाठिंब्याने समाजवादी पार्टीतर्फे लढले तेव्हा येडियुरप्पांनी त्यांना दणक्यात हरवले. अपवाद १९९९चा. पहल्यांदाच ते पराभूत झाले. मात्र पक्षाला या जनाधार असलेल्या नेत्याची किंमत माहित असल्याने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. पुढील निवडणुकीत त्यांनी दमदार पुनरागमन केले. २००४मध्ये विरोधीपक्षनेते झाले. मधल्याकाळात ४० महिन्यासाठी ठरलेल्या भाजपा- जनता दल तडजोड सरकारमध्ये कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले तेव्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. मात्र २० महिन्यांनंतर कुमारस्वामींना पदाचा मोह सोडवेना आणि त्यांनी पद सोडण्यास नकार दिला. येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद हुकले. काही दिवसांनी जनता दलाला उपरती झाली. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. मात्र अवघ्या आठवड्यासाठीच. खातेवाटपावरून वाद घालत जनता दलाने सरकार पाडले. निवडणुका झाल्या. येडियुरप्पांनी झंझावाती प्रचार केला. ३० मे २००८ रोजी येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांचा बेधडक कारभार अंगाशी आला. आरोप झाले. बेकायदा खाण प्रकरण लोकायुक्तांकडे गेले. त्यांनी बंगळुरु, शिमोगा जमीन व्यवहारात येडियुरप्पांवर ठपका ठेवला. प्रचंड गदारोळ झाला. दिल्लीपर्यंत राजकारण झाले. अखेर ३१ जुलै २०११ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. सदानंद गौडा मुख्यमंत्री झाले. तेथून ते मनाने भाजपापासून दुरावले. त्यांनी ३० नोव्हेंबर २०१२ भाजपाला सोडचिठ्टी कर्नाटक जनता पार्टीची वेगळी वाट निवडली.  पण त्यांना आणि भाजपालाही फटका बसला. काँग्रेस सत्तेत आली. सिद्धारामय्या मुख्यमंत्री झाले. 

दरम्यानच्या काळात भाजपातही बदल सुरु झाले. नरेंद्र मोदींचे वारे वाहू लागले. २ जानेवारी २०१४ येडियुरप्पा स्वगृही परतले. कोणत्याही अटींविना. २०१४ मध्ये त्यांना तसेच त्यांच्या घनिष्ठ समर्थक शोभा करंदलाजे यांना उडुपी-चिकमगलुर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. ते निवडूनही आले. २०१६मध्ये भाजपाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद बहाल केले. परंपरा मोडत २०१८च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणूनही जाहीर केले. त्यांनी जोमाने प्रचारही सुरु केला. 

खरेतर वादग्रस्त नेत्याला, त्यातही पुन्हा पक्ष सोडून नुकसान करणाऱ्या पक्षात पुन्हा मानाने घ्यायचे, उमेदवारी द्यायची, तीही समर्थकासह आणि पुढे प्रदेशाध्यक्षपदाचा मान देऊन परंपरा मोडत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारी जाहीर करायचे हे सारे मोदी-शहांच्या राजकारणाशी विसंगत. मात्र त्यांनी ते केले ते येडियुरप्पांच्या बाबतीत. कदाचित कर्नाटकच्या राजकारणात १७टक्के संख्याबळासह संघटित राहून शंभर मतदारसंघातील निकाल फिरवण्याचे सामर्थ्य असलेल्या लिंगायत समाजामुळे तसे असेल. पण केले खरे. मात्र त्यानंतर पुन्हा ते त्याच भूमिकेत राहिले असेही नाही. विशेषत: काँग्रेसच्या सिद्धारामय्या सरकारने लिंगायत समाजाला अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्याचे कार्ड खेळल्यापासून तर नाहीच नाही. बहुधा आता येडियुरप्पाही आपल्या समाजाच्या हमखास मतांची मोठी मोट आपल्या पक्षासाठी बांधणार नाहीत असे भाजपाश्रेष्ठींना वाटले असावे किंवा आता मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर केलेच आहे, तर जाणार कोठे अशीही भूमिका असावी. कारण त्यांनंतर इतर समाजाच्या नेत्यांना भाजपाश्रेष्ठी चुचकारु लागले. 

येडियुरप्पांचे एकेकाळचे आणखी एक घनिष्ठ सहकारी के एस. इश्वरप्पा. ते कुरुबा समाजाते नेते. शिमोग्याचेच. त्यांनी मधल्याकाळात आपले महत्व वाढवणे सुरु केले.  सांगोली रायण्णा ब्रिगेडच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय आणि इतर जाती-जमातींना एकत्र करण्यास सुरुवात केली. येडियुरप्पांशी वाजलेही. अखेर श्रेष्टींनी हस्तक्षेप केला. मिटवले. मधल्या काळात जमीन घोटाळ्यातून त्यांना न्यायालयाने मुक्त केले. येडियुरप्पा प्रदेशाध्यक्ष झाले. मात्र त्यांनी उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात करताच थांबवले. केले असेल तुम्हाला प्रदेशाध्यक्ष मात्र उमेदवार आम्ही ठरवू. खासदार असूनही विधानसभा उमदेवारीचा नियम मोडला गेला  तो फक्त येडियुरप्पांसाठी. मात्र ते केवळ अपवाद नसल्याचे लवकरच दिसून आले. सर्वच बाबतीत. वादग्रस्त असूनही उमेदवारी. बेल्लारीचे खासदार बी.श्रीरामुलू. तेथील गली जनार्दन रेड्डी या वादग्रस्त खाणमालकाचा समर्थक. सुषमा स्वराज या बेल्लारीतून लढल्या तेव्हा याच रेड्डीबंधूंनी मदत केली होती. अगदी त्यांचे नाते भावा-बहिणीचे. मात्र भाजपाशी असलेल्या या नात्याचा वापर करत सिद्धारामय्या यांनी मोहीम राबवली. भाजपाच्या तत्कालिन सरकारला खाण माफियांचे सरकार ठरवले. सत्ता मिळवली. आता पुन्हा तेच रेड्डी बंधू भाजपा श्रेष्टींच्या जवळ. त्यांचे समर्थक म्हणजे खासदार श्रीरामुलू. वाल्मिकी समाजाचा हा नेता किमान २० मतदारसंघात निर्णायक समीकरणे ठरवू शकतो. २०१४मध्ये भाजपात परत येऊन ते खासदार झाले.  आता खासदार असूनही त्यांना आमदारकीची उमेदवारी देण्यात आली. बागलकोट जिल्ह्यातील बदामी मतदारसंघात सिद्धारामय्यांविरोधात मैदानात उतरवण्यात आले. 


त्यामुळे खासदार असूनही आमदारकी लढवण्याची संधी मिळालेले येडियुरप्पा एकमेव अपवाद ठरले नाहीत. तसेच त्यांनी असाच अपवाद करण्यास सांगितलेल्या खासदार शोभा करंदलाजे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. एवढेच नव्हे तर मोठा धक्का देण्यात आला तो वरुणा मतदारसंघात. गेले काही महिने तेथे मेहनत घेतलेल्या विजयेंद्र या येडियुरप्पांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली.. पुढे त्याची राज्य भाजयुमो सरचिटणीस म्हणून नियुक्ती जरी झाली तरी ती नुकसानभरपाई येडियुरप्पांचे राजकीय नुकसान भरुन काढणारी नव्हतीच. जमीनी गमावलेल्या भूमीहीन शेतकऱ्यांसाठी सुरुवातीच्या काळात संघर्ष केलेल्या येडियुरप्पांना तशाच वेदना... हक्काचं गमावण्याच्या वेदना सहन कराव्या लागल्या.

त्यामुळेच बहुधा येडियुरप्पा काही महिनेच मुख्यमंत्री, अशी चर्चा सुरु झाली. ते फारतर लोकसभा निवडणुकीची गरज सरेपर्यंत. त्यानंतर त्यांना हटवले जाईल. अवघे पाऊणशे वयोमानाचे कारण आहेच. भाजपाचे कडवट विरोधक अभिनेत प्रकाशराज यांचे येडियुरप्पा हे तीन महिनेही राहणार नाहीत, हे विधान त्यातूनच आले असावे. त्यामुळेच येडियुरप्पांनी विश्वासातील शोभा करंदलाजेंना विधानसभेत आणून आपला पर्याय तयार ठेवण्याचा प्रयत्न केला. पण श्रेष्ठींनी तोही हाणून पाडला. मुलालाही उमेदवारी नाकारली. त्याचवेळी आणखी एक वेगळी चर्चा पुढे आली. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर रेड्डीबंधूंची आर्थिक शक्ती कामी येईल आणि त्यांचा मुख्यमंत्री आणि जनता दलाचे कुमारस्वामी उपमुख्यमंत्री अशी चर्चा रंगू लागली. त्यामुळे खरेतर एखादा खचून गेला असता. पण खचतील ते येडियुरप्पा कसले? 

    आपल्या लिंगायत समाजाची सत्ता ठरवण्याची शक्ती म्हणजे आपलीच शक्ती येडियुरप्पांना माहित आहे. त्यामुळेच ते कितीही काही घडले तरी कच खात नाहीत. बेधडकपणे वागतात. पुढे जातात. कर्नाटकातील भाजपाचा सर्वात मोठा जनाधार असलेल्या या नेत्याचा प्रवास आहेच तसा बेधडकपणे पुढे आणि पुढेच जाण्याचा. त्यातच प्रतिकुलतेतही समर्थकांचे मनोबल वाढते ठेवावेच लागते. त्यातूच त्यांनी निकालाआधीच आपल्या शपथविधीची तारीखही जाहीर केली असावी. मात्र यावेळी सोपे काही नाही. सामना सिद्धारामय्यांशी आहे. हिशेबी राजकारणाचा मुकाबला करताना अडथळे अनेक आहेत. त्यातही सर्वात मोठा अडथळा जनता दलाचा. पहिले मुख्यमंत्रीपद औटघटकेचे ठरण्यासाठी कारणीभूत ठरले होते त्या जनता दलाचाच. त्याचवेळी पक्षांतर्गत बेल्लारीच्या रेड्डींपासून ते शिमोग्याच्या इश्वरप्पांपर्यंत ‘अनंत’ अडथळे आहेत. त्यामुळे यावेळी ते परिस्थिती कशी बदलवतात त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. अर्थात परिस्थिती बदलवणे ज्योतिषांच्या सल्ल्याने YEDIYURAPPA या पूर्वीच्या स्पेलिंगमध्ये YEDDYURAPPA असा बदल करण्याएवढे सोपे नाही, हे येडियुरप्पांनाही कळत असावेच!
 

Web Title: Karnatak Election 2018 - Why does Yeddyurappa's war just not against Congress and Janata Dal but BJP also?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.