Vidarbha Crime: तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा तलावात मिळाला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:29 IST2025-10-05T16:29:06+5:302025-10-05T16:29:56+5:30
Crime news Marathi: २५ वर्षीय तरुण २ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना तलावातील पाण्यात तरंगताना त्याचा मृतदेह दिसला.

Vidarbha Crime: तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा तलावात मिळाला मृतदेह
Crime News in Marathi : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शोदेपूर गावात शुक्रवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. गावाजवळील जंगल परिसरातील तलावात एक तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृताची ओळख पटली असून, तो शोदेपूर येथील रहिवासी शामलाल मानू मरस्कोले (वय २५) आहे.
२ ऑक्टोबरपासून शामलाल रहस्यमयरीत्या बेपत्ता होता. गुरुवारी संध्याकाळी ग्रामस्थांना तलावाच्या काठावर त्याचे कपडे आणि चप्पल आढळले होते. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र अंधार वाढल्याने शोध थांबवावा लागला. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध घेत असताना मृतदेह तलावातील पाण्यावर तरंगताना दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार खोब्रागडे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे पाठविण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिस तपास सुरू असून, त्याचा तलावात नेमका मृत्यू कशामुळे झाला असावा, हा प्रश्न कायम आहे.