खरेदीच्या बहाण्याने सोने पळविणाऱ्या महिलेसह तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 04:47 PM2021-11-11T16:47:20+5:302021-11-11T16:52:26+5:30

२९ ऑक्टोबर राेजी तीन अनोळखी व्यक्तीने येऊन मोठ्या शिताफीने सोन्याचे टॉप्स वजन सात ग्रॅम किंमत ३६ हजार रुपये लंपास केले होते. हा प्रकार लक्षात येताच निखिल लेदे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Three arrested for gold jewelry theft | खरेदीच्या बहाण्याने सोने पळविणाऱ्या महिलेसह तिघे जेरबंद

खरेदीच्या बहाण्याने सोने पळविणाऱ्या महिलेसह तिघे जेरबंद

Next
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : सोलापूर जिल्ह्यातील चोरटे, मुद्देमाल हस्तगत

भंडारा : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफा दुकानात शिरून सोन्याचे टॉप्स पळविणाऱ्या चोरट्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून सोलापूर जिल्ह्यातून एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून सोन्याचे टॉप्स हस्तगत करण्यात आले आहे.

रेखा पृथ्वीराज चव्हाण (५०) रा. यशवंतनगर अकलूज, जि. सोलापूर, संजय अशोक साळुंखे (४०) रा. जत जि. सांगली, तात्यासो प्रकाश साळुंखे (२६) रा. कीर्तीनगर अकलुज जि. सोलापूर अशी चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांनी वर्धा, जळगाव आणि चंद्रपूर येथेही अशाच पद्धतीने चोरी केल्याचे तपासात पुढे आले आहे.

भंडारा शहरातील मुख्य बाजारातील सराफा लाईनमध्ये निखिल भास्करराव लेदे यांचे लेदे ज्वेलर्स आहे. २९ ऑक्टोबर राेजी तीन अनोळखी व्यक्तीने येऊन मोठ्या शिताफीने सोन्याचे टॉप्स वजन सात ग्रॅम किंमत ३६ हजार रुपये लंपास केले होते. हा प्रकार लक्षात येताच निखिल लेदे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू झाला. या चोरीचा तपास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर पद्धतीने सुरू केला. पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत व त्यांच्या पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

सोलापूर जिल्ह्यातील अकलुज येथील रेखा चव्हाण या महिलेवर संशय बळावला. एक पथक तेथे रवाना झाले. रेखा चव्हाण हिला मोठ्या शिताफीने तिची चौकशी केली. त्यावेळेस तिने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी संजय साळुंखे, तात्या साळुंखे यांना ताब्यात घेतले. मात्र आशा भगत साळुंखे ही महिला पसार झाली. अवघ्या आठ दिवसात स्थानिक गुन्हे शाखेचे या चोरीचा छडा लावला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, भंडारा शहरचे ठाणेदार, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार, पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, पोलीस उपनिरीक्षक अरविंद जगने, सुधीर मडामे, नितीन महाजन, किशोर मेश्राम, नंदकिशोर मारबते, योगेश पेठे, मंगेश माळोदे, दिनेश आंबेडारे, स्नेहल गजभिये यांनी केली.

अशी केली सराफात चोरी

लेदे ज्वेलर्समध्ये २९ ऑक्टोबर रोजी एक इसम व दोन महिला सोने खरेदीसाठी आल्या होत्या. कानातील टॉप्स दाखविण्याला दुकानदाराला सांगितले होते. कारागिराने या तिघांना टॉप्स दाखविले. त्यावेळी त्यांनी यापेक्षा मोठे टॉप्स पाहिजे व दोन दिवसात पाहिजे, असे सांगितले. परंतु दिवाळीमुळे दोन दिवसात होणार नाही, असे सांगताच ते निघून गेले. परंतु नंतर टॉप्सच्या पॉकिटमध्ये एक जोडी टॉप्स कमी आढळून आले. त्यावरून दुकानातील सीसीटीव्हीची तपासणी केली त्यावेळी या महिलांनी दोन टॉप्स मोठ्या सफाईने चोरून नेल्याचे दिसत होते.

वर्धा, जळगाव व चंद्रपुरातही गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलेल्या या सोनेरी टोळीने वर्धा, जळगाव आणि चंद्रपूर येथेही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याच चोरट्यांजवळून भंडारा येथून चोरून नेलेल्या दोन टॉप्ससह दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रही जप्त केले आहेत. तसेच त्यांच्याजवळून बोलेरो जीपही जप्त केली. आणखी कुठे चोरी केली याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Three arrested for gold jewelry theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.