‘त्या’ ग्रामसेवकाला निलंबित करा

By Admin | Updated: September 20, 2016 00:35 IST2016-09-20T00:35:06+5:302016-09-20T00:35:06+5:30

पवनी तालुक्यातील मांगली येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत घडलेल्या प्रकारात ग्रामसेवक दत्ता जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,..

Suspain the Gramsevak | ‘त्या’ ग्रामसेवकाला निलंबित करा

‘त्या’ ग्रामसेवकाला निलंबित करा

सीईओंना निवेदन : मांगली ग्रामवासीयांची मागणी
भंडारा : पवनी तालुक्यातील मांगली येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत घडलेल्या प्रकारात ग्रामसेवक दत्ता जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व मांगली ग्रामवासीयांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले.
मांगली येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय घेण्यात आला होता. नियमाप्रमाणे सभेचे कोरम पूर्ण झाल्यावर ग्रामसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यांच्या परवानगीने सभेला सुरूवात करण्यात आली.
सभेचे कोरम पूर्ण झाले असून ग्रामसेवकाने नकळत सभाध्यक्षांची सही घेवून सभा स्थगित दाखविली व सभेतून ग्रामसेवक जाधव निघून गेले. परंतु सभा अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे कोरम पूर्ण झाल्यामुळे परत सभा ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविली. त्यामध्ये गोवर्धन बावनकर यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेची कारवाई पुर्ण झाल्यामुळे नवीन अध्यक्ष व ग्रामवासीयांचे आभार मानण्यात आले. सभा आटोपल्यानंतर प्रोसेडिंगची कॉपी ग्रामपंचायत सदस्यांना मिळाली. घडलेला प्रकार ग्रामसेवक दत्ता जाधव यांना निवडलेला अध्यक्ष त्यांच्या मर्जीतला नसल्यामुळे त्यांनी रात्री ११.३० वाजता पवनी पोलीस ठाण्यात जावून प्रतिष्ठीत नागरिकांविरूद्ध खोटी तक्रार केली. ग्रामसेवक संघटनेचे सचिव असल्यामुळे नेतेगीरीचा आव आणून गावकऱ्यांवर खोटे आरोप लावण्यात आले आहे, असा आरोपही निवेदनातून ग्रामस्थांनी केला आहे.
यापूर्वीही त्यांनी गावकऱ्यांनावर खोटे आरोप लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केले असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
यासर्व प्रकारामध्ये एका ग्रामसेवकाचा खोट्या माहितीमुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे नाहकच जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये ग्रामसेवकांविरोधात असंतोष निर्माण झाला असून अशा ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास ग्रामवासी व ग्रामपंचायत सदस्य आंदोलन उभारतील, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspain the Gramsevak